Home औरंगाबाद ढगफुटी : औरंगाबादला गुलाब चक्रिवादळाने झोडपले

ढगफुटी : औरंगाबादला गुलाब चक्रिवादळाने झोडपले

9160
0

अनेक घरात पाणी ; रस्त्यांना नदीचे स्वरूप


औरंगाबाद : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळामुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले.  शहरात सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. सकाळी पुन्हा पावसाचे वेग वाढल्यामुळे ढगपुâटी सदृष्य पाऊस कोसळला. मध्यरात्री ते सकाळी ११.१५ वाजेपर्यंत ९८ मिमी पावसाची नोंद झाली. धुवॉधार पावसाने शहरात झाडे कोसळली, विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये एकच हाहा:कार उडाला. शहरातील जनजिवन विस्कळीत झाले असून बाजारपेठही बंद ठेवली. गुलाबी चक्रिवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे शहराला देखील पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. मध्यरात्री पासून पावसाला सुरूवात झाली. सकाळी मात्र पावसाचे तुफान आले. अवघ्या अर्धातासातच धुवॉधार पावसाने शहराला झोडपून काढले. खामनदीला पूर आला असून नालेही दुथडी भरून वाहत होते. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. अध्र्या तासात ५२ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावरच वाहने थांबवावी लागली. संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाले. जुन्या शहराला पावसाचा सर्वाधिक फटका बसला.  

 विविध भागात झाडे कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा


महापालिकेच्या मुख्यालयातील झाड व भिंत कोसळल्यामुळे रिक्षा आणि मारोती-८००, महिंद्रा एसयूव्ही, टाटा नॅनो, स्पार्क व तवेरा चार वाहनांचे नुकसान झाले. तसेच टाऊन हॉल भागातील लिंबाचे झाड कोसळले असून कला दालनाच्या भिंतीलगत उभ्या असलेल्या मारोती कारवर झाडाची फांदी पडल्याने कारचे नुकसान झाले. त्यासोबतच टाऊन हॉलमधील कला दालनाच्या छताचे कौलारू कोसळले. त्यामुळे छत उघडे पडले. या भागातील विद्युत खांब पडल्याने विज पुरवठा खंडीत झाला. जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील सहा ते सात झाडे कोसळल्यामुळे जिल्हा परिषद ओकीबोकी दिसू लागली. उल्कानगरीतील स्मशानभुमी गल्ली, क्रांतीचौक उड्डाणपुल, शिवाजी हायस्कुल येथील कमान, नूर कॉलनी, सहकारनगर, संभाजीपेठ या ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली. मनपाच्या अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य केले.  

विद्यानगर, दलालवाडी, नागेश्वरवाडीत घरात पाणी
विद्यानगर वॉर्डातील वेदमंत्रा अपार्टमेंट, अलंकार सोसायटी सोसायटीमध्ये पाणी शिरले. घरात पाणी शिरल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक तथा माजी नगरसेवक राजू वैद्य यांनी तातडीने वॉर्ड अभियंता वाघमारे यांना कळवून मदतीसाठी बोलावून घेतले. मनपाच्या पथकाने धाव घेत पाण्याला मोकळी वाट करून दिली. क्रांतीचौक वॉर्डात सिध्देशनगर, न्यु श्रेयनगर भागात नाल्याच्या पुराचे पाणी शिरले. वॉर्ड अभियंता नाना पाटील, परदेशी यांनी जेसीबीने नाल्याचा प्रवाह मोकळा केला. औषधी भवनच्या नाल्याचे पाणी दलालवाडीतील दहा घरांमध्ये शिरले. घरासमोर उभी असलेली दुचाकी वाहने पाण्यात वाहून जाण्याची भिती निर्माण झाली होती. मध्य विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी यांनी शिवसैनिकांच्या मदतीने दलालवाडीतील वाहने गल्लीबाहेर काढले. तसेच नागेश्वरवाडीतही घरांमध्ये पाणी शिरले. तसेच सखल भागातील व तळमजल्यातील अनेक दुकानामध्ये पाणी शिरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी उपसा करण्याचे मदतकार्य केले.

सातारा-देवळाईला पाण्याचा वेढा
सातारा-देवळाई परिसराला पाण्याने विळखा घातला. नाल्यातील पाणी अपार्टमेंट आणि परिसरातील घरांमध्ये शिरले. नाल्याच्या पाण्यामुळे बीडबायपास रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. न्यु छत्रपतीनगरच्या कमानीतून नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. मोदी टावरसमोरील रस्ता पाणीखाली गेल्याने वाहनांना मार्ग बंद झाला होता. सातारा-देवळाई परीसरातील प्रत्येक कॉलनीला पाण्याचा वेढा पडला होता. रेणूकामाता मंदिर कमान परिसर, अलोकनगर, आयप्पा मंदिर परिसर, देवळाई परिसर भागात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. अनेक भागातील वसाहतीमध्ये जाण्यासाठी रस्ता राहिलेला नव्हता. नाले देखील दुथडी भरून वाहत होते. अनेक भागाचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अडचणींना तोड द्यावे लागले.

खामनदीला पूर, नालेही भरून वाहिले


हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तीनफुट पाणी भिंतीवरून नदीपात्रात आले. पहाटेपासूनच नदी वाहू लागली. त्यानंतर झालेल्या पावसाने खाम नदीला पूर आला. नदीचे पाणी काठावरील घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला. नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी जागोजागी गर्दी केली होती. तसेच शहरातील वाहणारे नऊ नालेही दुथडी भरून वाहत होते. नाल्याचे पाणी सखल भागात शिरले. मुकुंदवाडी भागातील विश्रामनगरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. पत्र्यांची घरे पाण्यात गेल्याने अनेकांचे संसार पाण्यात बुडाले.

दुपारपर्यंत ९८ मिमी पाऊस कोसळला  


एमजीएम मधील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्ररूप धारण केले त्यावेळेस एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पावसाचा वेग ११०.७ मीमी प्रतितास मोजला गेला. या नंतर सकाळी १०:५१ ते ११:२१ या अर्ध्यातासाच्या कालावधीत ढगफूटी पेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. या तीस मिनीटाच्या काळात पाऊस पडण्याचा  सरासरी  वेग हा १०८.० मीमी प्रति तास एवढा  नोंदला गेला. तसेच या तीस मिनिटांच्या कालावधीत ५२.२ मी.मी पावसाची नोंद झाली. म्हणजेच  एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र शहरावर पुन्हा ढगफुटीपेक्षा वेगाच्या पावसाने झोडपून काढले. ताशी शंभर मी.मी. किंवा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हंटली जाते मध्यरात्री १२:१० ते सकाळी ११:१५ या सुमारे अकरा तासात एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत ९८.३ तर एमजीएम गांधेली वेधशाळेत ७४.९ मीमी पावसाची नोंद झाली.

महापालिकेचे मदतकार्य, सतर्क राहण्याचे आवाहन
शहरात पावसाला सुरूवात होताच महापालिकेचे वॉर्ड अधिकारी, वॉर्ड अभियंता, सफाई कामगार, अग्निशमन दलाचे कर्मचारी रस्त्यावर तैनात होते. अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी फोन येताच तातडीने कर्मचारी घटनास्थळी जाऊन मदत कार्य करीत होते. घरात पाणी शिरले, झाडे कोसळली, भिंत कोसळली अशा प्रकारचे वीस कॉल अग्निशमनला आले होते. तसेच वॉर्ड अधिकारी आणि अभियंता देखील जागोजागी तैनात होते. पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून मदत कार्य करीत होते. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी अनेक भागात फिरून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रविंद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त संतोष टेंगळे, सौरभ जोशी, घनकचरा कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, कार्यकारी अभियंता संजय काकडे, बी. डी. फड यांच्यासह वॉर्ड अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here