Home औरंगाबाद आरोग्य विभाग मेगाभरतीत ‘मेगा घोडेबाजार’! शिक्षकाची साडूसह डेप्युटी कलेक्टरमार्फत थेट मंत्रालयात सेटिंग?

आरोग्य विभाग मेगाभरतीत ‘मेगा घोडेबाजार’! शिक्षकाची साडूसह डेप्युटी कलेक्टरमार्फत थेट मंत्रालयात सेटिंग?

23910
0

लाखोंची मागणी, एजंटचा सुळसुळाट; आरोग्य संचालक कार्यालय ते मंत्रालयापर्यंत धागेदोरे ?

परीक्षा पारदर्शक होणार, आरोग्यमंत्र्याचा खुलासा


औरंगाबाद /गणेश गाडेकर : आरोग्य विभागामार्फत २५ आणि २६ सप्टेंबर असे दोन दिवस गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गाच्या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांकडून सेटिंग लावण्याचे काम गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत वशिलेबाजी करून एका पदासाठी १५ ते २० लाख रुपये उकळले जात असल्याचे समोर आले आहे. दै. मराठवाडा साथीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये एजंटने पदासाठी पैशाची आणि आरोग्य संचालक कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सेटिंग असल्याचा खुलासा केला आहे. या गंभीर प्रकारामुळे एकूणच भरती प्रक्रिया बोगस पद्धतीने होणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान भरती प्रक्रियेचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडूनच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट थेट ऊत्तर प्रदेश मधील परीक्षा केंद्र देऊ केल्याने भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ सुरु आहे असे दिसते. यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला सूचना दिल्याचे स्पष्ट केले.
आरोग्य विभागाच्या ‘क’ वर्गाच्या २७३९ पदासाठी व ‘ड’ वर्गाच्या ३४३६ पदासाठी ऑनलाईन परीक्षा शनिवार (२५) आणि रविवारी (२६) रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जवळपास ८ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी दिवसरात्र तयारी करत आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्ग अवलंबून घोडेबाजार सुरु केल्याने एजंटचा देखील सुळसुळाट झाला आहे. आरोग्य संचालक कार्यालय ते थेट मंत्रायलापर्यंत आपला वशिला आहे. असे सांगून एका पदासाठी पंधरा ते वीस लाख रुपयांची मागणी करत असल्याचे उघडकीस आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यभरात नोकरभरतीच्या काम करून देतो म्हणून लुबाडणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतीलच काहीनी भरती प्रक्रियेत हात धुऊन घेण्याचा मेगा प्लॅन आखल्याची देखील बोलले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थी आणि पालकातून होत आहे.
दरम्यान, औरंगाबादेत पोलीस भरती प्रक्रियेत डमी उमेदवार आणि मोबाईल डिवाइसद्वारे परीक्षा देतांना तिघांना अटक केली होती, त्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत असे प्रकार होण्याची शक्यता आहे.

6200 पदांसाठी परीक्षा
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

डमी उमेदवाराचा प्लॅन
मार्क वाढवण्यासाठी १० लाख ते १५ लाखापर्यंत किंमत घेतल्या जात आहे. त्यासाठी सुरुवातीला ऍडव्हान्स म्हणून २ ते ५ लाख रुपये जमा करावे लागत आहे. डमी उमेदवार बसवण्यासाठी आणि बाहेरून उत्तरे पुरविण्यासाठी देखील एजंट लोकांनी सेटिंग लावली आहे. त्यासाठी १५ ते २० लाख रुपये उमेदवाराकडून घेतले जात आहे. त्यातही ५ लाखापेक्षा जास्त रक्कम ऍडव्हान्स म्हणून घेतली जात आहे, तर उर्वरित रक्कम देईपर्यंत उमेदवाराचे ओरिजनल कागदपत्रे एजंट स्वतःकडे ठेऊन घेत आहे.

मंत्र्यांच्या नावे रॉकेट?
आरोग्य मंत्र्यांशी ओळख आहे, मुख्यमंत्री कार्यालयात आपला खास माणूस आहे, परीक्षा विभागात आमची सेटिंग आहे, हे मंत्री माझ्या जवळचे आहे. अशा थापा मारून हे एजंट पैसे उकळविण्याचे काम करत असून याला सर्व सामान्य विद्यार्थी देखील बळी पडत आहे. मात्र भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने यात वशिलेबाजीने नोकरीची आशा धरणाऱ्यानी सावध राहण्याची गरज आहे. पैसे दिल्याचा किंवा घेतल्याचा विशेष ठोस पुरावा नसल्याने एजंट पळून जाण्याचा किंवा पैसे न देण्याच्या घटना देखील याअगोदर घडल्या आहे.

  • एजंटशी थेट संवाद..
  • प्रतिनिधी : सर क गटासाठी काम होईल का?
  • एजंट : हां.. होईल, काम करुन देऊ आपण! बाकी बोलले ना..
  • प्रतिनिधी : सर, मग काय करावे लागेल?
  • एजंट : ओरिजनल डॉक्युमेंट द्यावे लागतील, पाच कोरे चेक आणि दोन लाख रुपये अॅडव्हान्स व १० लाख रुपये काम झाल्यावर द्यावे लागतील
  • प्रतिनिधी : ऑनलाइन आहे तर काम होणार नाही, असे सगळे म्हणाताहेत तर कसं?
  • एजंट : पेपर ऑनलाइन नाही आॅफलाईन आहे.
  • प्रतिनिधी : काम नाही झालं तर?…
  • एजंट : काम १०० टक्के होणार.. विश्वास ठेवा.
  • प्रतिनिधी : पैसे कधी दिले नाहीत, गॅरंटी काय राहील?
  • एजंट : कामाचं टेन्शन घेऊ नका.. विश्वास ठेवावं लागेल… तुम्हाला काही धोका होणार नाही… काम होऊन जाईल! मी स्वत: शिक्षक आहे…. माझ्या समोरचा माणूस डेप्युटी कलेक्टर आहे. काम मंत्रालयातूनच होणार आहे.
  • प्रतिनिधी : परीक्षेला दुसऱ्याला बसवणार की मलाच द्यावी लागेल.
  • एजंट : परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल.. काम होऊन जाईल.
  • प्रतिनिधी : सर, तुम्ही कुठून बोलता? औरंगाबादहून का?
  • एजंट : नाही, मी अंबाजोगाईहून बोलतोय..
  • प्रतिनिधी : ठीकयं सर मी सांगतो तुम्हाला…!

भरती पारदर्शक पद्धतीनेच होणार – टोपे
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ साठी २७०० जागा आणि गट ‘ड’ साठी ३५०० जागा भरल्या जाणार आहे. या जागेसाठी ८ लाखापेक्षा जास्त अर्ज आले आहे. सर्व विद्यार्थ्यांना आवाहन आहे कि, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, कोणत्याही अफवेला बळी पडू नये. परीक्षा पारदर्शक पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. मागील काही पेपरच्या अनुभवावरून परीक्षा केंद्रावर जॅमर बसवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पेट्रोलिंग करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here