Home राजकीय उपसभापती पदाच्या लालसेने राडा ; काँग्रेसचा हात सोडून भाजपशी ‘हात’मिळवणी

उपसभापती पदाच्या लालसेने राडा ; काँग्रेसचा हात सोडून भाजपशी ‘हात’मिळवणी

7461
0

सभापती काँग्रेसचा तर उपसभापती भाजपचा

औरंगाबाद / गणेश गाडेकर
राजकीय पक्षांमध्ये पदासाठी शेवटच्या टोकाला जाण्याची वृत्ती हल्ली वाढली आहे. औरंगाबाद पंचायत समितीत दोन दिवसांपूर्वी उपसभापती पदाच्या लालसेने काँग्रेसच्या इच्छुक पदाधिकाऱ्याने भाजपात गेलेल्या जुन्या सहकार्याला बेदम चोप देत चांगलाच राडा केला. काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात येऊन काही तासात उपसभापती झाल्याने पक्षीय बल जास्त असून सुद्धा अनेक दिवसापासून उपसभापती पदाचे बाशिंग बांधून असलेल्या मारहाण करणाऱ्या इच्छुकाला तोंडघशी पडावे लागले. याच रागातून त्याने चौथ्याच दिवशी स्वप्न भंग करणाऱ्याला उपसभापतीच्या दालनात शिरून त्याला मारहाण केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये देखील आता राडा संस्कृती फोफावत असल्याचे दिसून आहे.

औरंगाबाद पंचायत समितीत एकूण 20 सदस्य पैकी काँग्रेसचे 8, भाजप-7, सेना-3 अपक्ष-2 असे पक्षीय बलाबल आहे. गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. यात युतीच्या काळात 2015 ला शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली व मालती पडुल यांनी उपसभापती पद मिळवले. यात गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या सदस्यांत पक्षाअंतर्गत कलह सुरु होते. तसेच सेनेच्या उपसभापतींचा राजीनामा घेऊन काँग्रेसच्या मर्जीतील सदस्यांना उपसभापती पद देण्याच्या हालचालीही सुरू होत्या. काही दिवसापूर्वी सेनेच्या उपसभापती मालती पडुल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने औरंगाबाद पंचायत समितीचे उपसभापती पद रिक्त होते. यावर काँग्रेसचे अनुराग शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. परंतु या नावासाठी काँग्रेस मधील काही नेत्यांचा मात्र विरोध होता. याचाच राग मनात धरून आणि ऐन वेळी भाजपने दिलेल्या ऑफरला स्वीकारून 29 जुलै रोजी उपसभापती निवडीसाठी झालेल्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस सदस्य अर्जुन शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ठरल्याप्रमाणे भाजपने त्यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत काँग्रेसच्या सभापती छाया घोगरे, सुभाष भालेराव आणि एक अपक्ष अशी काँग्रेसची चार मते फुटल्याने उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अनुराग शिंदे यांना 9 मते तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्जुन शेळके यांना 10 मते मिळाली. भाजपच्या या राजकीय खेळीने काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला. याचाच राग मनात धरून औरंगाबाद पंचायत समितीचे अर्जुन शेळके यांच्या दालनात घुसून सोमवारी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. काँग्रेसच्या सदस्यांना हा पराभव सहन झाला नाही. त्यामुळेच त्यांनी सोमवारी अचानक आपल्या दालनात घुसून हल्ला केला असा आरोप शेळकेंनी केला आहे.

येथेही काका पुतण्याचे राजकारण…..
काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती अंकुशराव शेळके यांचे विद्यमान भाजपचे सभापती अर्जुन शेळके हे पुतणे आहेत. काकांना न विचारातच भाजपात प्रवेश केल्याने काका चांगलेच नाराज होते. याबाबत त्यांनी गावातील सत्कार समारंभात याबाबत उघडपणे बोलून देखील दाखवले तर त्यांच्या विजयी मिरवणुकीकडे देखील पाठ फिरवली होती. यावेळी पुतण्याने जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत केलेल्या पक्ष प्रवेशाची देखील काकांना आठवण करून दिली.

काँग्रेसला सत्तेचा माज - औताडे....
काँग्रेसने लोकशाहीला काळिमा फासणारी घटना केली. काँग्रेसला सत्तेचा माज आहे, येणाऱ्या काळात जनता त्यांना योग्य जागा दाखवेल. यासोबतच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते येणाऱ्या काळात भाजपात प्रवेश करणार आहे. जर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्या तर भाजप देखील इट का जबाब पत्थर से देना जाणती है. येणाऱ्या काळात मी स्वतः शिंदे यांच्या गावात जाऊन भाजपाची शाखा स्थापन करणार आहे. काँग्रेसला सत्तेच्या माज असल्याने १० लोकांनी मिळून एका व्यक्तीवर हल्ला केला सरकारी मालमत्तेचे नुकसान केले तरी मात्र सत्तेमुळे गुन्हे दाखल झाले नाही. आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. येणाऱ्या २४ तासात संबंधितांवर गुन्हा दाखल केला नाही तर भाजपा विभागीय आयुक्ताकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.
- विजय औताडे - जिल्हाध्यक्ष भाजपा
काँग्रेससोबत गद्दारी करणाऱ्याला धडा शिकवणारच - अनुराग शिंदे 
माझ्या कामानिमित्त आम्ही दोन मित्रासह पंचायत समिती मध्ये गेलो होतो. उपसभापती यांनी आम्हाला केबिन मध्ये बोलावले होते, त्यांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना सुभेच्छा दिल्या. त्यांच्या कॅबिनमध्ये लावण्यात आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या फोटोऐवजी दानवे आणि बागडे यांचे फोटो लावण्यात आले होते. याविषयी आम्ही विचारणा केली असता त्यांनी आम्हाला कोण बाळासाहेब आम्ही कोणत्या शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्याला ओळखत नाही. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकार केला. काँग्रेस गांधी विचाराचा पक्ष असला तरी त्यात भगतसिंग, चंद्रशेखर आझाद सरदार वल्लभ भाई पटेल देखील काँग्रेसचे शिलेदार होते हे भाजपने विसरू नये. काँग्रेस पक्षाशी कोणी गद्दारी करत असेल तर युवक काँग्रेस त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही.
अनुराग शिंदे, काँग्रेस, पंचायत समिती सदस्य.
… तर उपसभापती पद रद्द होऊ शकते
पक्षाने व्हीप बजावल्यानंतर त्याच्या विरोधात जर मतदान केलं तर त्यांचं पद जाऊ शकते. निवडून आल्यानंतर तो पक्ष सोडून इतर पक्षात गेल्यानंतर त्यासाठी पद रद्द करण्याचा अधिकार सभापती याना आहे. या प्रकरणात संबंधित विरोधकांना पक्षांतर बंदी कायदा १९८५ नुसार न्यायालयात दाद मागता येते. दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षातर केले तर कारवाई होत नाही.
ऍड विशाल बागल, उच्च न्यायायल, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here