Home राजकीय अजित पवार भाजपाबरोबर जातील का?

अजित पवार भाजपाबरोबर जातील का?

3422
0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत विचारलं असता त्यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (१८ एप्रिल) अकोला येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “कमळ हा शब्द प्रेमाचा संदेश देणारा शब्द आहे. त्या शब्दाचा अर्थ दुसऱ्यांची घरं तोडणारा होऊ शकत नाही. ईडी व सीबीआय ही दोन माकडं केंद्र सरकारने पोसली आहेत. त्याच्या माध्यमातून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचं काम सुरू झालं आहे. ईडी-सीबीआयचा वापर करून लोकशाहीच्या सर्व यंत्रणांना दाबण्याचा प्रकार सुरू आहे. हे लपून राहिलेलं नाही, सर्व देशाला कळत आहे.”

“आमची भूमिका स्पष्ट आहे की, लोकशाहीतील हुकुमशाही प्रवृत्तीपासून देशाचं संविधान, लोकशाही वाचवणं. काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या देशात सुई बनत नव्हती. ६० वर्षात हा देश सुईपासून रॉकेटपर्यंत गेला. देशाला महासत्ता बनवलं. देशातील जनतेला मुख्य प्रवाहात आणलं. आज मोदी आणि भाजपाचं सरकार या देशाला बरबाद करण्याचं काम करत आहे. त्याविरोधात आमची लढाई आहे,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

“अजित पवार भाजपाबरोबर जातील असं मला वाटत नाही. आम्ही परवाही वज्रमुठ सभेच्या माध्यमातून नागपूरला सोबत होतो,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.“अजित पवार भाजपात गेले तर त्यांची काय अवस्था होईल?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर पटोले म्हणाले, “मी भाजपा सोडून आलोय, मी अडीच वर्षे बाकी असताना खासदारकी सोडली आहे. भाजपाचे लोक कसे आहेत, हे मला माहिती.”“मी २०१७ मध्ये सांगितलं होतं की, ते देश बरबाद करायला निघाले आहेत. आज देशाच्या जनतेला जाणीव झाली आहे. मी तेव्हा जे वक्तव्य केलं होतं ते आज देशाची जनता भोगते आहे. भाजपा लोकशाहीविरोधी पक्ष आहे. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत,” असं पटोलेंनी सांगितलं.

“अजित पवार भाजपाबरोबर गेल्यास ‘प्लॅन बी’ काय?” या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, “लोकशाहीत जनता ज्याच्याबरोबर असते त्याला प्लॅन बी करण्याची गरज नसते. महाराष्ट्राचं चित्र आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. लोक काँग्रेसबरोबर कशी येतात हे दिसतं आहे.”“अकोला पदवीधर मतदारसंघातील लोकांनी आमच्या नवख्या उमेदवाराला निवडून दिलं. तसेच त्या मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या, देवेंद्र फडणवीसांच्या नाकाचा केस असलेल्या मुरब्बी नेत्याला पदवीधर लोकांनी पाडलं. यावरून जनतेच्या मनातील बदल दिसतो,” असंही त्यांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here