Home क्राइम भंडाऱ्याच्या सोनी कुटुंबात तिघांची हत्या, साडेतीन कोटींची लूट, सात जणांना फाशी की...

भंडाऱ्याच्या सोनी कुटुंबात तिघांची हत्या, साडेतीन कोटींची लूट, सात जणांना फाशी की जन्मठेप?

775
0

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या सोनी कुटुंबाच्या हत्याकांड प्रकरणी अंतिम सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात झाली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला. तिहेरी हत्या प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले असून, त्यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. एकाच कुटुंबातील तिघा जणांच्या हत्येने २०१४ साली भंडारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोपींना फाशी होणार की जन्मठेप, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात राहणारे सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा दृमिल या तिघांची २६ फेब्रुवारी २०१४ रोजी मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या घरातून ८.३ किलो सोनं, ३४५ ग्रॅम चांदी आणि ३९ लाख रुपयांची रोकड असा तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटल्याचा आरोप झाला होता.

तिहेरी हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसरमधून, दोघांना नागपुरातून, तर एकाला मुंबईतून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. हत्याकांडातून वाचलेल्या संजय सोनी यांच्या कन्येने उज्ज्वल निकम यांची भेट घेत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.सोनी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या तुमसर पोलिसांनी ट्रिपल मर्डर प्रकरणात ८०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना केमिकल आणि डीएनए अहवालही कोर्टात सादर केले होते. या पुराव्याच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाला असून आज न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here