Home jobs देशातील रोजगारात महिलांचा वाढता सहभाग.. कृषी क्षेत्रात ६३ टक्के महिलांचा सहभाग!

देशातील रोजगारात महिलांचा वाढता सहभाग.. कृषी क्षेत्रात ६३ टक्के महिलांचा सहभाग!

654
0

आपल्या देशात महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना काही क्षेत्रांत तर त्या पुरुषांपेक्षाही जास्त जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. आपलं मूळ असलेले कृषी क्षेत्रही याला अपवाद नाही. किंबहुना एक आनंदाची गोष्ट म्हणजे, कृषी क्षेत्रातील महिलांची संख्या, त्यांचा सहभाग गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. फक्त आपल्या घरातल्यांचंच पोट न भरता अनेक महिला शेतकरी आपला देश ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी झटत आहेत. काळ्या आईशी इमान राखत असंख्य लोकांचं पोट भरत आहे. महत्त्वाचं म्हणजे, देशातील महिला शेतकऱ्यांची संख्या आता वाढत आहे. श्रम मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आलं आहे. श्रम मंत्रालयानं महिला कर्मचाऱ्यांबाबत हे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशपातळीचा विचार करता सर्वात जास्त महिला कृषी क्षेत्रात आहेत, असं या रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. कृषी क्षेत्रातील महिलांची संख्या साधारणपणे ६३ टक्के आहे. त्यानंतर उत्पादन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महिलांची संख्या जास्त आहे, असंही या रिपोर्ट्मध्ये म्हटलं आहे.

कृषी क्षेत्रात आणि एकूणच श्रम क्षेत्रात महिलांची संख्या वाढण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचं हे फळ असल्याचं सांगितलं जात आहे. श्रम क्षेत्रात महिलांची संख्या वाढण्यासाठी त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणं आणि रोजगाराच्या गुणवत्तेत वाढ होणं खूप महत्त्वाचं आहे. श्रमाची कामं करणाऱ्या महिलांना रोजगाराच्या समान संधी आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी श्रम कायद्यातही अनेक सुरक्षात्मक तरतुदी करण्यात आल्या. यामध्ये वर्किंग वुमन्स म्हणजेच कामकरी महिलांची मातृत्वाची रजा १२ आठवड्यांवरून २६ आठवडे करण्यात आली. ५० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कामाच्या ठिकाणी लहान बाळांसाठी क्रेशची सुविधा करण्याची तरतूद तसंच नाइट शिफ्ट म्हणजे रात्रपाळीत जर महिला कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवणं अशा तरतुदींचा समावेश आहे.

खाणकाम क्षेत्रातही महिला मजुरांची संख्या खूप आहे. जमिनीखाली असलेल्या खाणींमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी, ज्या ठिकाणी सतत उपस्थितीची आवश्यकता नाही अशा ठिकाणी, संध्याकाळी ७ ते सकाळी ६ आणि सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पर्यवेक्षण, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कामं करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. समान काम, समान रोजगाराच्या संधी आणि कामाचं स्वरूप सारखं असेल त्या ठिकाणी कामाच्या मोबदल्यातही स्त्री-पुरुष भेदभाव केला जाणार नाही, असं केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात हे स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे कर्मचारी भरतीतही स्त्री-पुरुष भेदभाव केला जाणार नाही. ज्या क्षेत्रात कायद्यानेच महिलांना रोजगारासाठी बंदी आहे त्याच क्षेत्राचा याला अपवाद असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रोजगारातील समान संधी यावर रामेश्वर तेली यांनी विशेष भर दिला आहे. कोणतीही कंपनी किंवा व्यवसाय केवळ महिला आहे म्हणून त्यांना संधी नाकारू शकत नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. तसंच कामाचा मोबदला देण्याबाबतही समान वेतन कायदा, १९७६ प्रमाणंच (जो आता वेतन कोड, २०१९ म्हणून लागू आहे ) मोबदला दिला जाईल, अशीही यात तरतूद आहे.

औद्योगिक क्षेत्रातील महिलांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आणि प्रादेशिक व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमधून एका नेटवर्कच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे. उद्योग क्षेत्रात काही तरी करू इच्छिणाऱ्या अनेक महिलांना मुद्रा योजनांसारख्या अनेक योजनांचा लाभ होत आहे. जवळपास ७० टक्के महिलांना मुद्रा योजनेचा लाभ होत असल्याची माहिती आहे. तर गेल्या बचतगटासारख्या स्वयंसाहाय्यता गटांची संख्याही गेल्या आठ वर्षांमध्ये तीन पटींनी वाढली आहे. भारताच्या स्टार्ट अप इको सिस्टीममध्येही असाच ट्रेण्ड पाहायला मिळतो, ही नक्कीच सकारात्मक गोष्ट आहे. भारतातील जवळपास १२ मिलियन महिलांकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग युनिटची मालकी आणि ते चालवण्याची परवानगीदेखील आहे. अनेक क्षेत्रांतील उद्योगांची मालकी महिलांकडे आहे. इंटरनेट आणि मोबाईलचा वापर वाढल्याने महिला उद्योजकांमध्ये वाढ झाल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जे मूळ उद्योग आहेत, त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. खादी ग्रामोद्योगामध्ये ४ लाख ९० हजार कर्मचाऱ्यांमध्ये ८० टक्के महिला आहेत. उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन दिल्यास, अनुकूल वातावरण निर्माण केल्यास आणि विशेषतः रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्यास काय घडू शकतं याचं हे उदाहरण आहे.

कृषी क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र हे सहसा पूर्वीपासूनच पुरुषांची मक्तेदारी समजली जातं. खरं तर आपल्याकडे स्त्रिया घर आणि अर्थार्जन अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतात. कुटुंबाचा सांभाळ, त्यांचं खाणं-पिणं, त्यांचं आरोग्य आणि त्याचबरोबर नोकरीतील टेन्शन अशी तारेवरची कसरत अनेकजणी कित्येक वर्षे करत आल्या आहेत. त्याचबरोबर छोटा व्यवसाय सुरू करून त्यातून उद्योगिनी होणाऱ्याही अनेकजणी आपल्या आसपास आहेत. कधी गरज म्हणून तर कधी हौस म्हणून काही महिलांनी छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्यातूनच यशाची भरारी घेतलेल्या अनेकजणी उद्योग क्षेत्रात अन्य महिलांनाही प्रोत्साहन देत आहेत. तर दुसरीकडे उच्च शिक्षण घेतलेल्या अनेकजणी आपल्या मातीकडे परत वळत आहेत. घरची शेती सांभाळण्यासाठी परत गावाकडे जाऊन स्थिरावत आहेत, बदलत्या काळानुसार अनेक प्रयोग करत आहेत. अत्यंत अवघड अशा अवजड उद्योगांतही स्त्रियांनी यशाची मोहोर उमटवली आहे. एकूणच संधी आणि योग्य वातावरण मिळालं तर महिला संधीचं सोनंही करू शकतात हेच यातून सिद्ध होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here