Home Uncategorized निवडणुकीपूर्वी दुधावरून राजकारण पेटलं, अमूल Vs नंदिनी

निवडणुकीपूर्वी दुधावरून राजकारण पेटलं, अमूल Vs नंदिनी

670
0

मुंबई : तुम्हाला ‘नायक’ चित्रपट आठवतोय… होय, अनिल कपूरचा चित्रपट, ज्यात आपल्या नेत्याला दुधाने आंघोळ घालण्याचे दृश्य आहे, पण सध्या हे दूध कर्नाटक निवडणुकीत मोठा मुद्दा बनला आहे. कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून यावरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे. दरम्यान, अमूल आणि नंदिनी या दुधाच्या दोन मोठ्या ब्रँडवरून दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. तामिळनाडूतील अलीकडील दही वादानंतर आता कर्नाटकातही दुधावरून युद्ध सुरू झाले आहे.

अमूल दूध आणि नंदिनी हे दोन ब्रँड यावेळी आमनेसामने उभे आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्यात निवडणुकीपूर्वी राजकीय पारा चढला असून सोशल मीडियापासून सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे. कर्नाटक को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशनचा (KMF) ‘नंदिनी’ ब्रँड तिथे चांगली कामगिरी करत असताना निवडणुकीच्या वातावरणात अमूल ब्रँडची बंगळुरू मार्केटमध्ये झालेली एंट्री त्याचे कारण बनले आहे. अशा स्थितीत अमूल खरोखरच नंदिनीशी स्पर्धा करू शकेल का, कारण दोन कंपन्यांमध्ये जोरदार ‘प्राईस वॉर’ होणार असे चित्र सध्या दिसत आहे.

अमूलने काही काळापूर्वी कर्नाटकात एन्ट्री घेतली असून विरोधक काँग्रेस त्याचा विरोध करत आहे. काँग्रेस नेते याला भाजपचे कारस्थान म्हणत असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी गुजरातच्या अमूल कंपनीला विरोध करत स्थानिक ब्रँड नंदिनीला संपवण्याचा हा डाव असल्याचा दावा केला. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली भाजप सरकार अमूल कंपनीला मदत करत असल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यातील नंदिनी ब्रँड बंद करायचा आहे, असा दावा काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केला. अमूल ब्रँड राज्यावर लादण्याचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले. कर्नाटक बाजारात अमूल दुधाच्या एन्ट्रीने राज्यातील जनता किंवा विरोधी राजकीय पक्षांनी विरोध केला असून गेल्या अनेक दिवसांपासून #GoBackAmul आणि #SaveNandini सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

गुजरातचा अमूल ब्रँड हा देशातील सर्वात मोठा दुधाचा ब्रँड असला तरी त्याचे दूध संपूर्ण देशात विकले जात नाही. या ब्रँडला बऱ्याच राज्यातील दूध सहकारी संस्थांकडून स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. आणि ताजं प्रकरण कर्नाटकच्या KMF आणि तिच्या दूध ब्रँड नंदिनीचं आहे. अमूलपेक्षा लहान असूनही कर्नाटक, आसपासच्या राज्यांमध्ये आणि विशेषत: बंगळुरूमध्ये ‘नंदिनी’ अनेक बाबतीत वरचढ आहे.

नंदिनी ब्रँडसाठी २४ लाख पशुपालकांकडून दररोज ८१.३ लाख लिटर तर अमूल ३६.४ लाख शेतकऱ्यांकडून दररोज सुमारे २.६३ कोटी लिटर दूध संकलन करते. तसेच ‘नंदिनी’ दररोज १० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करते, तर अमूल ५२ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करते. दुसरीकडे, दोन्ही दुधाच्या किमतीकडे पहिले तर इथे नंदिनी आघाडीवर दिसत आहे. दोन्ही ब्रँड टोन्ड मिल्क, फुल क्रीम मिल्क आणि दही यासारख्या जवळपास सर्व लोकप्रिय श्रेणींची विक्री करते. अमूलच्या टोन्ड दुधाची प्रति लिटर किंमत ५४ रुपये, फुल क्रीम दुधाची किंमत ६६ रुपये आहे तर नंदिनीचे टोन्ड दूध ४३ रुपये प्रति लिटर आणि फुल क्रीम दूध ५५ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. म्हणजे नंदिनी दूध थेट ११ रुपयांनी प्रति लिटर स्वस्त आहे.

जागतिक बँकेच्या मदतीने १९७४ मध्ये ‘नंदिनी’ ब्रँडची सुरुवात झाली होती. KMF थेट सहकार मंत्रालय, कर्नाटक राज्य सरकारच्या अंतर्गत येते. २००८ मध्ये कर्नाटक सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना २ रुपये प्रति लिटर दराने प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली, तर सध्या तो प्रतिलिटर ६ रुपये झाला आहे. म्हणूनच KMF देशातील इतर दूध सहकारी संस्थांपेक्षा स्वस्तात दूध विकू शकते. बंगळुरूमधील दुधाच्या बाजारपेठेचा ७०% भाग नंदिनीने व्यापला असून ३३ लाख लिटर दुधाची मागणी असून, त्यापैकी नंदिनी दररोज २३ लाख लिटर दुधाचा पुरवठा करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here