Home क्राइम बनावट कागदपत्राआधारे शासकीय कंत्राट मिळविणाऱ्या बोगस ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

बनावट कागदपत्राआधारे शासकीय कंत्राट मिळविणाऱ्या बोगस ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

3339
0

औरंगाबाद : बनावट कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे ८४ लाख ७४ हजारांचे कंत्राट मिळविणाऱ्या बोगस ठेकेदाराविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान विलास आव्हाड (रा. एकलहेरा, पिंप्री राजा) असे बोगस ठेकेदाराचे नाव आहे. (Crime against a bogus contractor who obtained a government contract on the basis of forged documents)

अशोक माणिकराव घुगे (५६ ) हे पैठण उपविभागाच्या ग्रामीण पाणीपुरवठा येथे उपअभियंता म्हणून कार्यरत होते. ते सध्या कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमा अंतर्गत मौजे आडुळ व आडुळ तांडा ता.पैठण येथील पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सहीने मंजीरी ट्रेडर्सचे एम. एम. मुस्तारे ( वसमत, जि.हिंगोली) यांना ३ ऑगस्ट २०१८ रोजी देण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, (Maharashtra jivan Pradhikaran) मुंबईचे सदस्य सचिव यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १ मार्च २०२१ रोजी कळविले की, भगवान आव्हाड याने वर्ग दोन प्रवर्गासाठीचे नोंदणी कंत्राटदार प्रमाणपत्र दि. ०३ ऑगस्ट २०१९ रोजी प्राप्त केले असुन त्यासाठी त्याने काही बनावट कागदपत्रे दि.२० मार्च २०१९ रोजी कार्यालयात सादर केली आहेत. त्यामुळे त्याच्या प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी करून अभिप्राय देण्यास सांगितले. यावेळी त्यांनी कोविड परिस्थितीमुळे सर्व कागदपत्रे ऑनलाईन पाठविली. त्यावरुन आव्हाडच्या सर्व कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली तेव्हा आव्हाडने जी कामे स्वतः केली असल्याचे दर्शविले आहे त्या कामांचे कार्यारंभ आदेश दुसऱ्याच कंत्राटदारांचे नावाने असुन ती कामे स्वतः केली असल्याची खोटी माहिती सादर केल्याचे निष्पन्न झाले. आव्हाडने उपअभियंता पाणीपुरवठा विभागात काही करारनामे सादर केले होते. त्याआधारे त्याला प्रमाणात दिले होते. औरंगाबाद जिल्हापरिषद यांनी मंजीरी ट्रेडर्स यांना दि. ३ ऑगस्ट २०१८ रोजी दिलेल्या कार्यारंभ आदेशामध्ये फेरफार झालेला असुन आव्हाडने मंजीरी ट्रेडर्सच्या जागी स्वत:चे नाव टाकुन ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई यांच्या कार्यालयात २० मार्च २०१९ रोजी सादर केले. त्याद्वारे त्याने वर्ग दोन प्रवर्गातील कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. त्याआधारे आव्हाडने जि. प. पाणीपुरवठा विभागाकडून १५ जून २०२० रोजी ८४ लाख ७४ हजारांचे कंत्राट देखील मिळविले. परंतु त्याला पाणीपुरवठा विभागाकडुन कुठलेही देयक देण्यात आलेले नाही तसेच ते काम अद्याप सुरु झालेले नाही. सर्व प्रकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई यांना ऑनलाईन कळविण्यात आला. त्यावरुन आव्हाड यांचे कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र १७ मार्च २०२१ रोजी रद्द करण्यात आले. त्यानंतर जुन २०२१ मध्ये सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी जि. प. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली. त्यानंतर आव्हाड विरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात १९ ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ReplyForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here