Home महाराष्ट्र राज्य कसं चालतं…? कशावर चालतं….?

राज्य कसं चालतं…? कशावर चालतं….?

376
0

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकेल, असं वक्तव्य नारायण राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात बोलताना केलंय. तसेच उद्धव ठाकरेंनी समजावून सांगावं राज्यातल्या तिजोरीत किती पैसे आहेत, राज्याची अर्थव्यवस्था काय आहे? असं म्हणत सरकारचं स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारायण राणे यांनी प्रश्न केला आहे.ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर पुढच्या राजकारणाबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, “आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकेल. भाजपनं ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादीत केलं त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडीवरचा लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे. लोकांना आता तीन पक्षांची भांडण कळायला लागली आहेत. तसेच या सरकारच्या काळात भ्रष्टाचारही वाढू लागला आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष राहिला आहे. या निवडणुकांमध्ये भाजप विरुध्द तीन अशी लढाई झाली. त्यामध्ये भाजप सरस ठरलाय. आगामी निवडणुकांमध्ये जनता महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत.”
एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचं स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात बोलताना नारायण राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना अर्थखात्याचा अभ्यास नाही, भांडवल किती आहे?त्यांना आकडेवारी द्यायला सांगा. राज्य कसं चालतं? कशावर चालतं? याचा मुख्यमंत्र्यांना अभ्यास नाही. उद्धव ठाकरेंनी बाहेर पडून सांगावं राज्याच्या तिजोरीत किती पैसै आहेत? राज्याची अर्थव्यवस्था काय आहे? हे मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगावं.”चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला असता नारायण राणे म्हणाले की, “शिवसेना आयत्या बिळावर नागेबा आहे. जेव्हा या विमानतळाचं काम सुरु केलं, तेव्हा विनायक राऊतांनी विरोध केला होता. शिवसेनेचा या विमानतळाला विरोध होता. चिपीवर पाणी, रस्ता आणि वीज अद्याप आलेली नाही. तयारी काहीही झालेली नाही. ही तीन कामं झाल्याशिवाय एअरपोर्टचं उद्घाटन होणार नाही.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “२३ तारखेला उद्घाटन आहे, हे कोणी सांगितलं? कंपनीनं सांगितलंय का? केंद्र सरकरानं सांगितलं आहे का? तुम्ही २३ तारखेला या बघा, उद्धाटन होतं का?”नारायण राणे यांनी यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावीच त्यांचा पराभव झाल्याचं ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं. यासंदर्भात बोलताना नारायण राणे म्हणाले की, “एक ग्रामपंचायत गेली म्हणून काही होत नाही, इतर ठिकाणी चंद्रकांत पाटलांचं काम भक्कम आहे, टीका करणारे करत राहतात. चंद्रकांत पाटलांचं काम चांगलं आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here