Home राजकीय कर्नाटकात भाजपमध्ये निष्ठावंताचा राजीनामा

कर्नाटकात भाजपमध्ये निष्ठावंताचा राजीनामा

177
0

हृषिकेश देशपांडे
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून भारतीय जनता पक्षात असंतोष उफाळून आला आहे. एकेका जागेसाठी अनेक दावेदार असल्याने सगळ्यांना संधी देणे अशक्य आहे. त्यामुळे पक्षांतराची घाऊक मोहिम सुरु आहे. मात्र या साऱ्यात भाजपसाठी चिंतेची बाब म्हणजे जगदीश शेट्टर यांनी आमदारकीचा दिलेला राजीनामा. ६७ वर्षीय शेट्टर हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेली तीन दशके ते पक्षाशी संबंधित आहेत. हुबळी-धारवाड मध्य या मतदारसंघातून सहा वेळा विजयी झाले आहेत. लिंगायत समाजातील प्रमुख नेते अशी त्यांची ओळख आहेत. तसेच स्वच्छ प्रतीमेच्या जोरावर ते विजयी होत आले. माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. शेट्टर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षत्याग करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र शेट्टर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरतात की काँग्रेसमध्ये सामील होतात याची उत्सुकता आहे. कारण या मतदारसंघासाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न
भाजप श्रेष्ठींनी शेट्टर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेट्टर यांची भेट घेतली. यावेळी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने दर्शवली तसेच शेट्टर यांना मोठे पद देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र शेट्टर हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहीले. आता हुबळी-धारवाड परिसरात भाजपला शेट्टर समर्थकांच्या रोषाला तोंड द्यावे लागेल. धारवाडच्या १८ नगरसेवकांनी त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे देण्याचा प्रस्ताव दिला आहे. शेट्टर पक्षाबाहेर गेल्यास या पट्ट्यातील काही जागांवर परिणाम होऊ शकतो याची धास्ती असल्यानेच भाजपने त्यांची समजूत काढण्याचा अटोकाट प्रयत्न केला.

विरोधकांचे लक्ष
शेट्टर यांच्यासारखा अनुभवी नेता पक्षात आल्यास लाभ होईल हे काँग्रेसने हेरले आहे. त्यामुळेच आता त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेतेपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद ही पदे त्यांनी भूषवली आहेत. आपल्याला उमेदवारी नाकारण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेट्टर यांच्या आरोपांनी भाजपची कोंडी होणार हे उघड आहे. राज्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी शेट्टर यांच्या आरोपांनी खळबळ उडणार, मग भाजपला उत्तर द्यावे लागणार, यातून पक्षाची अडचण होणार आहे. शेट्टर यांनी पुढची दिशा स्पष्ट केली नसली, तरी अपक्ष लढण्यापेक्षा ते एख्याद्या पक्षात प्रवेश करतील असा अंदाज आहे.

पक्षत्यागाचा जनमानसात संदेश?
मुळात एखाद्या दलबदलूने उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडणे वेगळे, मात्र निष्ठावंतांनी निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने वेगळे संदेश जाणार हे स्पष्ट आहे. यामुळे अन्य काही नाराजांमध्येही अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी भाजपला कर्नाटक राखणे जिकीरीचे जाणार आहे. शेट्टर यांनी जर काही नेत्यांवर आरोप केले तर त्याचा प्रतिवाद कसा करणार? यातून पक्षाच्या दृष्टीने चुकीचा संदेश जाऊ शकतो. कर्नाटकमध्ये उमेदवारी देताना नवे प्रयोग करणे भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने असे काही प्रयोग केले, मात्र दोन्ही राज्यातील सामाजिक परिस्थिती भिन्न आहे. यातून शेट्टर यांना उमेदवारी नाकारणे भाजपसाठी त्रासदायक ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here