Home औरंगाबाद औरंगाबाद मनपा निवडणूक : आज प्रकरण सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रारसमोर

औरंगाबाद मनपा निवडणूक : आज प्रकरण सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रारसमोर

2446
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : गतवर्षीं एप्रिल महिन्यात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे पुन्हा वार्ड रचना करण्यात आली होती. मात्र, वार्ड रचना राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सोयीनुसार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले आणि निवडणूक लांबणीवर पडली. वादग्रस्त वार्ड रचना आणि मध्यंतरी कोरोनाचा कहर यामुळे वर्षभरापासून कारभार प्रशासकांच्या ताब्यात आहे. दरम्यान, आज मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार यांच्यासमोर प्रकरण येणार आहे. यात प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी रजिस्ट्रार यांच्याकडे म्हणणे मांडले असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त तथा विधी अधिकारी अपर्णा थेटे यांनी सांगितले.
महापालिकेची मुदत संपल्याने गतवर्षी निवडणुका प्रस्तावित होत्या. निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने आरक्षण सोडत, वार्ड रचना व मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया केली होती. परंतु ही वॉर्ड रचना तयार करत असताना नियमांना डावलण्यात आले. असा आरोप करत या वॉर्ड रचनेविरुद्ध अनेकांनी न्यायालयात धाव घेतली होती. प्रकरण थेट सर्वोच्च कोर्टात पर्यंत गेले. सुप्रीम कोर्टाने देखील याचिका दाखल करून घेतली. दरम्यान, याप्रकरणी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, निवडणूक विभाग उपायुक्त, यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले. यानुसार अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सादर केले असल्याचे मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले. मात्र, यामधेय साखर आयुक्तांचे म्हणणे सादर झाले नव्हते. आज मंगळवारी महापालिकेचे वादग्रस्त वार्ड रचना प्रकरण रजिस्ट्रार यांच्यासमोर येणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची तयारी करून बसलेले अनेक पक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष लावून बसले आहेत.

महापालिका निवडणुकीसासाठी सर्वच पक्षांची तयारी पूर्ण, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

अनेकांचे उमेदवार निश्चित, वार्डनिहाय बैठकांवर जोर

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेली वार्डरचना वादग्रस्त ठरल्याने प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले. त्यामुळे वर्षभरापासून पालिकेचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने निवडणुका सरकारने पुढे ढकलण्याचा दोन वेळा निर्णय घेतला. मध्यंतरी प्रादुर्भाव कमी झाला मात्र, प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने सर्वकाही कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. येत्या ९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, दुसरीकडे निवडणुकीचा बिगुल वाजेल या आशेवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, एमआयएम, वंचित आघाडी या सर्वानी स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या अनुषंगाने वार्डनिहाय तयारी पूर्ण केलेली आहे. अनेकांचे उमेदवार देखील निश्चित झालेले आहेत. त्यानुषंगाने दैनिक मराठवाडा साथीने विविध पक्षांची काय तयारी सुरु आहे याचा हा घेतलेला आढावा.

शिवसेना विकासकामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज

शिवसेनेची सर्व ११५ वॉर्डांची तयारी पूर्ण झाली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होऊन प्रारूप याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. वर्षभरात राज्य सरकारच्या वतीने शहरात झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा राबवली आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठा योजना, रस्ते, सफारी पार्क, गुंठेवारीचा निर्णय झाला. आता सिडकोचा निर्णय होत आहे. याआधीच्या सरकारने केवळ गप्पा मारल्या खऱ्या अर्थाने आता महाविकास आघाडी कामे करत आहे हे लोकांना आता पटले आहे. याच बरोबर शिवसेनेची पक्ष बांधणी मजबूत आहे. शाखा, गटप्रमुख, सह गटप्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. वार्डनिहाय बैठका सुरू आहेत. स्वतंत्र की महाविकास आघाडी याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल. त्यानुसार सर्व तयारी पूर्ण झालेली आहे.

– रेणूकादास (राजू) वैद्य, विधानसभा संघटक, शिवसेना

————————

सत्ताधारी पक्षांना आधिवेशनात विरोधी पक्षाला सामोरे जाण्याची हिंमत नाही. त्यांच्याकडे जनतेसाठी कोणतेही ठोस काम नाही म्हणून हे सर्व नाटक सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ईतके दिवस राजकारण करणारे यावेळी शिवप्रेमींना शिवजयंती देखील मोकळ्या मनाने साजरी करू दिली नाही. ईतक्या खालच्या थराला यांनी राजकारण नेले आहे. हे लज्जास्पद आहे. येणाऱ्या मनपा निवडणूक साठी आम्ही तयार आहोत. परंतु महाविकास आघाडी ला पराभवाची भीती वाटत असल्याने ते निवडणुका टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकारने शहरासाठी कोणतीही योजना पुर्ण केली नाही. याउलट सुरू असलेल्या योजनेला स्थगिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः भुमीपुजन केलेल्या पाणी पुरवठा योजना देखील सुरू नाही. त्या कामाची वर्क आँडर देखील नाही. रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत. गुंढेवारी चा प्रश्न तसाच आहे. स्मार्ट सिटी फक्त कागदावरच आहे. शहराचा नामंतर प्रश्न रखडलेला आहे. यामुळे त्यांना पराभव दिसत असल्याने ते प्रशासनाला हाताशी धरून निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राजकारण करत आहेत.

सुहास दाशरथे, जिल्हा अध्यक्ष मनसे

——————————–

सर्व ११५ वार्डात भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण

येणाऱ्या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका आहेत. त्यामध्ये राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षांचा पराभव होऊ शकतो असा अहवाल आहे. जनमत या सरकारच्या विरोधात जात आहे. त्यामुळेच हे सरकार मनपा, नगर परिषद निवडणूक टाळण्यासाठी राजकारण करत आहे. मनपा प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही. प्रशासनाला देखील “निवडणुका” नको आहेत. यामध्ये प्रशासन देखील यामध्ये सामील आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास सज्ज आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन कामे करतो त्यामुळे जनमत हे भाजपच्या बाजूने उभे राहील यात शंका नाही.

-संजय केणेकर, शहर जिल्हा अध्यक्ष भाजपा

—————————–

कॉंग्रेस स्वबळावर लढणार ?

मनपा निवडणुका केव्हा होतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे. संपूर्ण 115 वॉर्डांत काँग्रेसची ताकद असावी या दृष्टीने तयारी केलेली आहे. गेल्या काही दिवसात काँग्रेसला शहरात चांगले दिवस येत असून, आजवर सुमारे साडेचारशे ते पाचशे जणांनी पक्षात प्रवेश केला आहे. आणखी देखील लोक येत्या काळात पक्षात प्रवेश करणार आहे. निवडणूक महाविकासआघाडी प्रमाणे लढवायची की स्वबळावर ? याबाबत पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याप्रमाणेच सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.

– हिषाम उस्मानी, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

—————————

मुस्लिम बहुल भागातही लढणार वंचित

यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी केली आहे. संपूर्ण ११५ वार्डात तयारी करण्यात आली आहे. मुस्लिम बहुल भागातही वंचित आपले नशीब आजमावणार आहे. या निवडणुका कुठल्या पक्षासोबत आघाडी करून लढायच्या हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. परंतु सध्या स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून वार्डनिहाय शाखा तसेच बुथ बांधणी केलेली आहे. जवळपास ८० टक्के काम पूर्ण देखील झाले असून, सर्वच वार्डातील उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.

– संदीप शिरसाट, शहर प्रमुख (पश्चिम), बहुजन वंचित आघाडी

————————

महाविकास आघाडीत लढलो तर आमचा फायदाच- राष्ट्रवादी

वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीत निवडणूक लढवण्याच जवळपास निश्चित झाले आहे. त्यानुसार आम्ही मागील एक वर्षापासून तयारी देखील करत आहोत. जवळपास ८० % बूथ रचना झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून विविध पक्षातून देखील आमच्याकडे १३ नगरसेवक आले आहे. तर यापूर्वीचे ४ असे एकूण १७ नगरसेवक तर आमचे निश्चित आहेत. महाविकास आघाडी जर झाली नाही तर आम्ही पूर्ण ११५ जागेवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत. तशी तयारी देखील आमची झाली आहे. महाविकास आघाडी सोबत लढली तर आम्हाला ३५ ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी आम्ही निश्चित विजयात २ अंकी संख्या घेऊ असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही महाविकास आघाडीत लढलो तर आम्हाला फायदाच होणार आहे. सर्व निर्णय हे वरिष्ठ पातळीवर ठरवल्या जाणार आहे. आम्ही आमच्या पातळीवर तयारी पूर्ण केली आहे.

-विजयराव साळवे- शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

——————–

आमचा उमेदवार प्रत्येक वॉर्डात

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत. जवळपास प्रत्येक वॉर्ड उमेदवारी देण्यात येणार आहे. लवकरच हैदराबाद येथून एक पथक येणार आहे. ते सर्व पहाणी करणार आहेत. ९ मार्च रोजी सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो हे पहात आहे. त्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यास पक्षाचे खासदार इम्तियाज जलील हे पुढील प्रक्रिया पार पाडतील.

– शारेक नखशबंदी, शहर अध्यक्ष, एमआयएम


Edited by : Pramod Adsule

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here