Home छत्रपती संभाजी नगर समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत तब्बल 900 अपघात; आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत तब्बल 900 अपघात; आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू

573
0

समृद्धी महामार्गाच्या उदघाटनानंतर पहिल्या 100 दिवसांत म्हणजेच 20 मार्च 2023 पर्यंत तब्बल 900 अपघात झालेत. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे, असे महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे या मार्गावर आठ ठिकाणी समुपदेशन केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील बोरुडे आणि बर्वे कुटुंबांतील सहा जणांचा याच मार्गावर शिवणी पिसा (ता. लोणार) येथे अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर हा मुद्दा विधिमंडळातही गाजला होता. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार असल्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आता सुरू करण्यात येत आहे.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटरच्या टप्प्याचे 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर सुरू झालेले अपघात सत्र थांबता थांबत नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभ्यासानुसार 11 डिसेंबर 2022 ते 20 मार्च 2023 पर्यंत समृद्धी एक्स्प्रेसवर वाहनांच्या अतिवेगाने यांत्रिक बिघाड होऊन 400 हून अधिक अपघात झाले. पंक्चर आणि टायर फुटल्यामुळे अनुक्रमे 130 आणि 108 हून अधिक अपघात झाले. त्याचप्रमाणे, वाहतुकीसाठी उघडलेल्या एक्स्प्रेस वेच्या भागावर इंधन संपलेल्या वाहनांमुळे 14% (126) अपघात झालेत. चालक झोपी जाणे, यांत्रिकरित्या अयोग्य वाहने आणि प्राणी प्रवेश करणे ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याचेही समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला मेहकरनजीक शिवणी पिसा गावाजवळ पुलावर भरधाव कार डांबराच्या पॅचवरून उसळून सुमारे ३०० फूट दूर जाऊन उलटल्याने अपघात झाला. यात गाडीचे छप्पर उडून कारमधील १३ प्रवासी रस्त्यावर पडले. त्यात सहा जण जागीच ठार झाले, तर चालकासह सात जण गंभीर जखमी झाले. या अपघाताचा मुद्दा विधानसभेत गाजला. त्यानंतर सरकार दक्ष झाले आहे.

समृद्धी महामार्गावरच्या मेहकर जवळच्या अपघाताचा मुद्दा आमदार संजय रायमुलकर यांनी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार असल्याची घोषणा केली होती. फडणवीस म्हणाले होते की, या महामार्गावर काही स्पॉट असे तयार झालेत की तिथे अपघात होत आहेत. मुळात समृद्धी महामार्ग सरळ आहे. त्याला वळणे कमी आहेत. काही स्पॉटवर मध्यंतरी माकडांचा वावर होता. अशा स्पॉटची माहिती गोळा केली आहे. सुधारणा सुरू आहे. त्याच्यावर इंटलिजेंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावत आहोत. त्यामुळे ओव्हर स्पीड, अपघात घडेल असा स्पॉट तयार झाला असेल, तर त्याची पूर्वसूचना देता येईल. कालच्या घटनेनंतर अशा सूचना दिला आहेत की, गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असले, तर त्यांना एंट्री करतानाच हटकले जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार उपायोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर राज्य परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी वाहतूक उपायुक्त भरत काळसकर यांनी 500 किलोमीटरचा प्रवास करून एक्स्प्रेस वेची पाहणी केली. या बैठकीत एक्स्प्रेस वेच्या आठही एंट्री पॉईंटवर चालकांचे अनिवार्य समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नागपूर-शिर्डी विभागात आठ समुपदेशन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. येत्या सात दिवसांत प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र सुरू केले जाणार आहे.

समृद्धी महामार्गावर आरटीओचे अधिकारी वाहन चालकांचे अर्धा ते एक तासाचे समुपदेशन करतील. समुपदेशन सत्राची सुरुवात रस्ता सुरक्षेवरील लघुपटाने होईल. त्यानंतर वाहन चालकांना प्रश्नपत्रिका सोडवायला दिली जाईल. धोकादायक वाहन चालवू नये, अशी प्रतिज्ञा त्यांना करायला लावली जाईल. चालकांना वाहनांचे टायर कसे असावे, याचीही माहिती दिली जाईल. सोबतच महामार्गावर विविध ठिकाणी जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here