Home इतर वैजापूर तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर

वैजापूर तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर

9
0

मराठवाडा साथी न्यूज
वैजापूर :
निवडणूक आयोगाने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर कोरोनामुळे स्थगित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नव्याने काउंटडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे ऑगस्ट ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना सोमवार, दि.२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या आहे. अंतिम प्रभाग रचनेत ग्रामपंचायतींचे प्रभाग व प्रवर्गनिहाय आरक्षण आता निश्चित झाल्यामुळे ग्रामपंचायतींचे कोणते प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी निश्चित झाले याची यादी मंगळवारी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात बघायला मिळेल.


मार्चमध्ये आलेल्या कोरोना व लॉकडाऊनमुळे जून व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने या निवडणुकीचे बिगुल वाजविण्यात आले आहे. त्याची प्रभाग निश्चितीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण झाली असून ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनामार्फत ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना २ नाेव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचनेत ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गनिहाय आरक्षण अता निश्चित झाले असून त्यानुषंगाने अंतिम प्रभाग रचनेत कोणता प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी निश्चित झाले याची यादी मंगळवारी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अणि तलाटी कार्यालयात लावण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी सांगितले.

सदस्यातून होणार सरपंचाची निवड
थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा मागील सरकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुका जुन्या पद्धतीने होणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांतूनच सरपंच निवड होणार आहे. त्यासाठीची आरक्षण प्रक्रिया प्रभाग निश्चितीनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे प्रभाग व सरपंच पदाचे आरक्षण काय पडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी पॅटर्नची कसोटी लागणार
प्रभाग निश्चिती झाल्यानंतर खऱ्याअर्थाने गावोगावी धुरळा उडणार आहे. दिवाळीनंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेतृत्वाची व महाविकास आघाडी पॅटर्नची कसोटी लागणार आहे.

पुढारी गुडघ्याला बाशिंग बांधून
करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी गावपुढाऱ्यांनी प्रशासकपदाची मागणी केली होती. मात्र, प्रशासक म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांची वर्णी लागल्याने या गाव पुढाऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याने ते दिसेनासे झाले होते. तर आता लवकरच निवडणूक लागणार असल्याने गायब झालेले सर्व पुढारी गावात गुडघ्याला बाशिंग बांधून दिसू लागले आहेत. त्यामुळे गाव पुढारी नावापुरतेच का, असा प्रश्न उभा राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here