Home मराठवाडा कोसळधार : मराठवाड्यात दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस ; नजीवन गारठले

कोसळधार : मराठवाड्यात दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस ; नजीवन गारठले

2103
0
छायाचित्र : माजेद खान

औरंगाबाद/प्रतिनिधी
मराठवाड्यात दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस कोसळत असून, गुरुवारी, १९ ऑगस्ट रोजी बहुतांश भागात सूर्यदर्शनही झालेले नाही. औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यातील मिळून १६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक भागातील शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने पीकपाणी बहरले असून, खताख्ी मात्रा देण्यासाठी शेतकरी आता वाफसा कधी होतोय, त्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या ४८ तासांपासून पावसाची संततधार सुरू असून, शहरातही जनजीवन संपूर्णत: गारठले आहे. पावसाने सगळ्यांचीच तारांबळ उडविली आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्यासारखा सध्याचा पाऊस मात्र सुरू नाही. औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील वैजापूर, बोरसर, लोणी, कन्नडमधील कन्नड, चापनेर, चिकलठाणा, पिशोर, चिंचोली, करंजखेड, खुलताबादमधील सुलतानपूर, सिल्लोडमधील आमठाणा, बोरगाव या बारा मंडळात तर नांदेडमधील भोकरच्या मोघली, किनवट, बोधाडी व माहूरच्या वानोला या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कन्नडच्या करंजखेड मंडळात १०५ मिमी पाऊस झाला. तर किनवट तालुक्यातील  बोधडी येथे ९५ मिमी पाऊस झाला आहे.

शेतांमध्ये पाणीच पाणी

पावसामुुळे पिकांना दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी जोरदार झालेल्या पावसामुळे शेतात काही ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांवर रो-किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रभारी डॉ. सूर्यकांत पवार यांनी सांगितले. ऑगस्टमध्ये सुरुवातीला जवळपास तीन आठवडे पावसाने विश्रांती घेतली होती. शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करून शेतीत माना टाकत असलेल्या पिकांना पाणी दिले. त्यानंतर एक-दोन दिवसातच पावसाचे पुनरागमन असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिमीने शेतांमधये पाणी साचू लागले आहे. औरंगाबाद विभागात जून-जुलैची सरासरी ३२० मिमी असून, पाऊस ४६५ मिमी झालेला आहे. तर ऑगस्ट महिन्याची सरासरी ११८.५ मिमी असून, आतापर्यंत ६४.४ मिमी पाऊस झाला आहे, असे विभागीय आयुक्तालयाच्या दैनंदिन पर्जन्य अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आजही हलका, मध्यम पाऊस

दोन दिवसांपासून मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून ते बंगालच्या उपसागर दरम्यान आहे. उत्तर ओडिशा आणि परिसर व दक्षिण झारखंड, प. बंगाल परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र झारखंडच्या दिशेने सरकून चक्रीय वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. उत्तर ओडिशा, दक्षिण झारखंड व परिसर, प. बंगाल ते उत्तर तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून, काही भागात चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे अनेक भागात ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी औरंगाबादसह मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता असल्याचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here