Home मुंबई अधिवेशनात करावी लागतेय वणवण; ठाकरें सेनेची पक्ष कार्यालयासाठी फिरस्ती

अधिवेशनात करावी लागतेय वणवण; ठाकरें सेनेची पक्ष कार्यालयासाठी फिरस्ती

238
0

मुंबई: शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटावर विधिमंडळातील कार्यालयही गमावण्याची वेळ आली. शिवसेना नाव मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून या कार्यालयाचा ताबा घेण्यात आला. यामुळे विधानसभा अधिवेशनात ठाकरे गटाला वणवण करावी लागत आहे. ठाकरे गटाकडून लेखी पत्र आल्यावरच विचार करू, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष यांनी घेतल्याने विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयातच ठाकरे गटाला कार्यालय थाटावे लागले आहे. शिंदे – ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आयोगाच्या निर्णयानंतर अधिकृत शिवसेना एकच असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. कार्यालयाची मागणी कोणत्या आधारावर करायची या गोंधळात नेते आणि आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षांसोबत विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीदरम्यान कार्यालय देण्याची विनंती करण्यात आली. मात्र लेखी पत्रानंतरच विचार करू अशी विधानसभा अध्यक्ष यांची भूमिका आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या सर्व बैठका आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातच पार पडल्या.पत्र लिहिल्यास वेगळा गटाचा पुरावा जाण्याची भीती आहे. विधानसभा अध्यक्षांकडे कार्यालय मागण्यासाठी जर लेखी पत्र दिले तर शिवसेनेचे आधीचे कार्यालय आमचे नाही, त्याचप्रमाणे शिवसेनेत फूट पडल्याचे स्पष्ट होऊन ठाकरे गट हा वेगळा गट असल्याचा पुरावा अध्यक्षांच्या हातात जात असल्याचे ठाकरे गटाचे मत आहे. त्यावर बोलताना आमदार अनिल परब यांनी आम्ही कार्यालयाबाबत कोणतीही मागणी करणार नाही. शिवसेना एकच असून कोणताही गट नाही. सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देईल, तेव्हा योग्य न्याय मिळेल, अशी भूमिका मांडली. एकूणच, सध्या तरी ठाकरे गट वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. कार्यालय गेल्यानंतर आता ठाकरे गट सध्याच आपली भूमिका जाहीर करणार नसल्याचे दिसून आले आहे. अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक झाली .शिंदे गटाने विधिमंडळातील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतल्याने आदित्य ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत सभागृहात मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदे गटाकडून आम्हाला घाबरवण्यासाठी वेगवेगळे कारस्थान रचले जात आहे. मात्र, आम्ही सभागृहात आक्रमक भूमिकेने काम करू, असे ते म्हणाले. तसेच ,राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झाले. या वेळी ठाकरे गट आणि शिंदे गटात संघर्ष पहायला मिळाला होता. नागपूर विधानभवनात प्रत्येक राजकीय पक्षासाठी वेगवेगळी कार्यालये आहेत. यापूर्वी शिवसेनेसाठी जे कार्यालय होते ते शिंदे गटाला देण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गटाला वेगळे कार्यालय देण्यात आले होते. त्यावेळीही दोन्ही गटामध्ये संघर्ष पहायला मिळाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here