Home क्राइम सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करणारे बारा तासात जिन्सी पोलिसांनी केले गजाआड

सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करणारे बारा तासात जिन्सी पोलिसांनी केले गजाआड

452
0

औरंगाबाद : पैशांच्या व्यवहारातून सामाजिक कार्यकर्त्याचे १८ आॅक्टोबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास घरातून अपहरण करण्यात आले होते. त्याची अवघ्या बारा तासात जिन्सी पोलिसांनी सुटका करुन दोघांना गजाआड केले.  ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली. शेख नय्यर शेख हुसेन (रा. किराडपुरा) आणि मुजफ्फर खान अन्वर खान (रा. करीम कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.

संजयनगरातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रियाज मोहम्मद रऊफ (४०) यांनी लॉकडाऊनच्या काळात शेख नय्यर याच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. हे पैसे रियाज परत करत नसल्याने शेख नय्यर हे त्यांच्या घरी दोन महिलांना साथीदारासह घेऊन गेले होते. महिलांना पाहून तरी तो पैसे देईल असा नय्यरचा समज होता. तरी देखील रियाज हे पैसे देत नसल्याने रविवारी रात्री नय्यर व त्याचा साथीदार मुजफ्फर असे दोघे त्यांच्या घरात शिरले. दोघांनी त्यांचे एका वाहनातून अपहरण केले. याप्रकारानंतर रियाज यांच्या पत्नी अजरा मोहम्मद रियाज यांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना तात्काळ आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दत्ता शेळके यांनी तपास सुरू केला. याच दरम्यान, आंबेडकरनगरातील नातेवाईकाच्या गॅरेजमध्ये रियाज यांना डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, जमादार हारुण शेख, पोलिस नाईक संजय गावंडे, पोलिस शिपाई सुनील जाधव, संतोष बमनावत यांनी छापा मारुन दोघांना पकडले.

फोन लोकेशनवरून अपहरणकर्ते जाळ्यात…..

पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी अपहरणकर्ता शेख नय्यर याचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्याआधारे तांत्रिक दृष्ट्या शोध घेत आंबेडकरनगर येथे पोहोचले. यावेळी अपहरणकर्ते हे रियाज यांना वैजापूरला घेऊन जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी रियाज यांची सुटका करत दोघांच्या मुसक्या आवळल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here