Home राजकीय शरद पवारांनी काँग्रेसला बसखाली ढकललं; भाजपाचा हल्ला

शरद पवारांनी काँग्रेसला बसखाली ढकललं; भाजपाचा हल्ला

287
0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसला एका मुलाखतीवरून बसखाली ढकललं असं म्हणत भाजपाने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. तसंच शरद पवारांनाही टोला लगावला आहे. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत काँग्रेसवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला बसखाली ढककलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अदाणी प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची घोषणा केल्यानंतर जेपीसीची मागणी अप्रासंगिक असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या मित्रपक्षांनी राहुल गांधींच्या विकृत विचारांना एकाच वेळी नाकारलं. हे दिसून येतं आहे. कारण वीर सावरकर यांच्यावर जी टीका राहुल गांधींनी केली त्यावरून उद्धव ठाकरेही आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं. या आशयाचं ट्वीट अमित मालवीय यांनी केलं आहे.

विरोधकांनी एका फर्मच्या अहवालावर लक्ष केंद्रीत करून त्याला महत्त्व दिलं. या फर्मची पार्श्वभूमी कुणालाही माहित नाही. त्यांचं नाव आम्ही कधीही ऐकलं नाही. या प्रकरणी एका औद्योगिक समूहाला टार्गेट करण्यात आलं. असं वक्तव्य करत शरद पवार यांनी अदाणी हिडेंनबर्ग प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी अदाणी समूहाबाबत जी भूमिका घेतली त्यावर शरद पवारांनी महत्त्वाचं भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, “तुम्ही ज्या कुणावर टीका करत असाल, टार्गेट करत असाल त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने अधिकार वापरले असतील तर त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला लोकशाहीने दिला आहे हे १०० टक्के मान्य आहे. पण काहीही अर्थ नसताना उगाचच हल्ला करायचा, हे मला समजू शकत नाही. पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानी यांनी मोठं योगदान दिलं आहे देशाला त्याची गरज नाही का? वीज क्षेत्रात अदाणी यांचं मोठं योगदान आहे देशाला वीज लागणार नाही का? देशाच्या गरजा लक्षात घेऊन देशाचं नाव त्या क्षेत्रात उंचावणारे हे लोक आहेत” असं म्हणत शरद पवारांनी राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांचे कान टोचले आहेत.या मुलाखतीनंतर शरद पवारांची चर्चा होते आहे. तर दुसरीकडे भाजपाने याच मुलाखतीवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here