Home दिल्ली शाहरुख खान ‘टाइम’च्या यादीत प्रथम; २०२३ मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती

शाहरुख खान ‘टाइम’च्या यादीत प्रथम; २०२३ मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती

281
0

नवी दिल्ली : ‘टाइम’ मासिकाच्या २०२३ च्या १०० जणांच्या यादीत अभिनेता शाहरुख खानने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने फुटबॉलपटू लायोनल मेस्सी, ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि मेगन मर्केल, ऑस्कर विजेती मिशेल यो आणि मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात एक हजार कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.

या यादीसाठी जवळपास १२ लाख वाचकांनी मतदान केले, त्यापैकी चार टक्के मते ५७ वर्षीय किंग खानला मिळाली. वर्षांतील सर्वात प्रभावी व्यक्ती ठरवण्यासाठी दरवर्षी ‘टाइम’ मासिक आपल्या वाचकांकडून प्रतिसाद मागवते. दुसरा क्रमांक इस्लामी शासनपद्धतीत अधिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा देणाऱ्या इराणी महिलांना मिळाला आहे.

ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांना तिसऱ्या तर त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना चौथ्या क्रमांकाने वाचकांची पसंती मिळाली आहे. हॅरी यांना १.९ टक्के मते मिळाली. जानेवारीमध्ये प्रकाशित झालेला त्यांचा ‘स्पेअर’ हा स्मरणग्रंथ चर्चेत राहिला होता, त्यांनी त्यामध्ये राजघराण्यातील अनेक पैलू उघड केले आहेत. फुटबॉलपटू मेस्सी १.८ टक्के मतांसह पाचव्या स्थानावर आहे. अभिनेत्री मिशेल यो, टेनिसपटू सेरेना विल्यम्स, झुकरबर्ग आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनॅशियो लुला दा सिल्वा यांचाही जगभरातील सर्वात प्रभावी शंभर व्यक्तींमध्ये समावेश आहे.

गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला इराणमध्ये महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीने स्वत:चे केस इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना हवे तसे बांधले नव्हते, म्हणून तिला मारहाण करण्यात आली, त्यात तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून इराणमध्ये महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये अनेक महिलांनी स्वत:चे केस झाकायला नकार दिला आणि अनेकींनी जाहीरपणे हिजाब जाळले. या सर्व महिलांना ‘टाइम’च्या यादीत तीन टक्के मतांसह दुसरे स्थान मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here