Home औरंगाबाद प्रा. राजन शिंदेंच्या हत्येचा तपास अद्यापही कुटुंबियाभोवतीच !

प्रा. राजन शिंदेंच्या हत्येचा तपास अद्यापही कुटुंबियाभोवतीच !

24654
0

तिसऱ्या दिवशी ५० जणांचे जबाब, शंभरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले


औरंंगाबाद : मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन हरिभाऊ शिंदे यांची हत्या झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी अद्यापही पोलिसांचा तपास हा कुटुंबियांभोवतीच फिरत आहे. बुधवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिवसभरात शिंदे कुटुंबियांशी संबंधित सुमारे पन्नास जणांचे जबाब नोंदवले. तर शिंदेच्या घरापासून संपूर्ण मुकुंदवाडी, गारखेडा, एन-४, एन-६ आदी भागातील शंभरावर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबीय तपासात सहकार्य करत नाहीये. मारेकऱ्याने हत्येसाठी वापरलेला चाकू, रक्ताने माखलेला शर्ट विहिरीत फेकल्याची शक्यता समोर आल्याने पोलिसांनी परिसरातील सर्व विहीरीत अग्निशमन विभागाच्या मदतीने पोलिसांनी शोध घेतला. मात्र, अद्याप ठोस असे काहीही हाती लागले नाही. मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ.राजन शिंदे यांची घरातच निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली होती. मंगळवारी दिवसभर पोलिसांनी प्रा.शिंदे यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी केली. परंतु त्यातून कोणतीही माहिती समोर न आल्यामुळे तपास पथकाच्या हाती निराशाच लागली. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी शिंदे यांचे कुटुंबीय व नातेवाईक स्मशानभूमीत राख सावडण्यासाठी गेले होते. दिवसभर घरात नातेवाईक असल्याने पोलिसांना कुटुंबियांची चौकशी करता आली नाही. मात्र, आता तपासाची दिशा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या करण्याकडे वळवली आहे. दिवसभरात शहरातील सुमारे शंभरावर सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. तर मारेकऱ्याने हत्येसाठी वापरलेले शस्त्र विहिरीत फेकल्याची शक्यता बळावल्याने पोलिसांनी परिसरातील सर्व विहिरीत शोध घेतला. दिवसभरात शिंदे कुटुंबियांशी संबंधित जवळपास ५० जणांची चौकशी करून जबाब नोंदवण्यात आले. 


मोबाईलच्या सीडीआरमधून अनेक गोष्टी उघड !
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कुटुंबातील सर्वच सदस्यांच्या मोबाईलचा सीडीआर हस्तगत केला आहे. त्यातून अनेक गोष्टी आता हळूहळू समोर येत आहेत. मंगळवारी तपासात एक सदस्य क्राईम पेट्रोल, क्राईमच्या वेबसिरीज पाहत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मोबाईलच्या सीडीआरमधून शिंदेच्या हत्ये संबंधित काही धागेदोरे लागतील का? याचा पोलीस शोध घेत आहेत. व्हाट्सएपची चॅटिंग, दीर्घकाळ कोणाचे कॉल सुरू होते. अशा अनेक बाबी उघड होत आहेत. विशेष म्हणजे ” कुटुंबातील काही सदस्यांचे पोलिसांना तपास करू नका” जे झाले ते झाले आता काही उपयोग नाही असे म्हणून असहकार्य केले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सबळ पुराव्यासाठी पोलिसांची अहोरात्र धावाधाव
प्रा.शिंदे यांचे मारेकरी शोधुन काढण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी विशेष पथकाची स्थापना केली असून पथकाची जबाबदारी गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे दिली आहे. तर सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक दत्ता शेळके, सुनील चव्हाण, मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांची एसआयटी टीम दिवसरात्र सबळ पुराव्यासाठी धडपड करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here