Home अपघात बातमी पाटण गोळीबार प्रकरण : शिवसेनेचे मदन कदम यांच्यासह कुटुंबातील चौघांना अटक

पाटण गोळीबार प्रकरण : शिवसेनेचे मदन कदम यांच्यासह कुटुंबातील चौघांना अटक

469
0

पाटण तालुक्यातील कोरडेवाडी येथे राजकीय वैमनस्यातून केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१९) रात्री घडली.श्रीरंग लक्ष्मण जाधव (वय ४८) व सतीश बाळू सावंत (वय ३५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश लक्ष्मण जाधव (वय ४४) हे यात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक व माजी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख मदन कदम याच्यासह कुटुंबातील चौघांना ताब्यात घेतले आहे. मदन कदम यांची पत्नी नीता मदन (वय ४५), मुलगा गौरव कदम (वय २२), योगेश कदम (वय २५, सर्वजण रा. शिद्रुकवाडी ता . पाटण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

या घटनेची पाटण पोलिसांत नोंद झाली असून, याबाबतची फिर्याद प्रकाश जाधव यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी मोरणा गुरेघर रस्त्यावर कोरडेवाडी गावच्या हद्दीत गाडीची धूळ अंगावर उडाली म्हणून फिर्यादी प्रकाश जाधव यांचे चुलत भाऊ सखाराम जाधव यांना मदन कदम व त्यांच्या मुलांनी मारहाण केली होती. त्यावेळी भांडणात मदन कदम यांनी श्रीरंग जाधव यांनाही शिवीगाळ केली होती. तसेच जर याबाबत कोणी विचारणा करायला आले तर गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. सखाराम जाधव यांनी घडलेली घटना प्रकाश व श्रीरंग यांना सांगितली व याप्रकरणी पाटण पोलिसांत तक्रार दाखल केली.

रविवारी (दि.१९) कोरडेवाडी, धावडे गावासह स्थानिक विकास सोसायटीची निवडणूक कोकिसरे येथे होती. तेथे प्रकाश व त्याचा मोठा भाऊ श्रीरंग हे ठाण्याहून मतदानाला आले होते. मतदान करून ते संध्याकाळी घरी आल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरंग, सतीश सावंत, प्रकाश व अन्य पाच-सहाजण मदन यांना सखाराम जाधव यांच्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी शिद्रुकवाडीतील त्यांच्या घरी गेले. त्यांनी मदन यांना घराबाहेर बोलावून तुम्ही मारहाण, शिवीगाळ का केली? असा जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी मदन यांच्यासह मुलगा योगेश, गौरव व पत्नी निता घरी होते. यानंतर जाधव मंडळी कदम यांच्या घरातून बाहेर पडली. त्यावेळी मदन हे घरातून बंदूक आणून द्या, त्यांना गोळ्या घालतो, असे म्हणत होते. मदन यांच्या पत्नीने घरातील बंदूक त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी पहिली गोळी श्रीरंग यांच्यावर झाडली तर दुसरी गोळी सतीश सावंत यांच्यावर झाडली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मदन व त्यांच्या मुलांनी प्रकाश याला मारहाण केली, यात तो गंभीर जखमी झाला.

घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक विकास पाडळे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड करीत आहेत. दरम्यान, या गोळीबारात मृत्यू झालेल्या श्रीरंग व सतीश यांचे मृतदेह इन कॅमेरा शिवविच्छेदनासाठी कराडला पाठवण्यात आले असून प्रकाश जाधव यांच्यावर कृष्णा रुग्णालय कराड येथे पुढील उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here