Home औरंगाबाद औरंगाबाद : गोळीबार करून बांधकाम ठेकेदाराचे अपहरण

औरंगाबाद : गोळीबार करून बांधकाम ठेकेदाराचे अपहरण

832
0

औरंगाबाद : हवेत फायरिंग करीत एका बांधकाम ठेकेदाराचे कारमधून चौघांनी अपहरण केल्याची थरारक घटना देवानगरी भागातील पीडब्लूडी कॉलनीत बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. नदीम पठाण राउफ पठाण असे ठेकेदाराचे नाव आहे. हवेत गोळी झाडून नदिमला चौघांनी कारमध्ये बसवून बीडबायपास रोडने धूम ठोकली. दरम्यान, बीड रस्त्यावरील भालगावनजीक कार बंद पडल्याने नदीमच्या पायावर गोळी झाडून जखमी अवस्थेत कारसह सोडून अपहरणकर्ते पसार झाले. चिकलठाणा पोलिसांनी नदीमला घाटीत दाखल केले.

नदीम यांनी देवानगरीतील पीडब्लूडी कॉलनीतील बँक अधिकारी मदन अवधूत भोसले यांच्या घराच्या बांधकामाचा ठेका घेतला आहे. जानेवारी महिन्यापासून तिथे बांधकाम सुरू आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी नदीम कामागरासह बांधकामाच्या ठिकाणी होते. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एक इंडिगो कार (एमएच-१४-सीके-५७३५) मधून तीन ते चार जण तिथे आले. त्यापैकी एकाने नदीमशी हात मिळवला. थोड्यावेळ बोलत उभे असताना त्यातील एकाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर नदीमला कारमध्ये ढकलून तेथून बीड बायपास रोडने पसार झाले. गोळी झाडल्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोक घराबाहेर आले. बांधकामावरील शेख रशीद, शेख सुलेमान, अकिम शहा यांनी कारच्या दिशने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत कार भरधाव निघून गेली. यावेळी एका दुचाकीवर मजुराने कारचा देवळाईपर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढे त्याला कार दिसली नाही. दरम्यान, बीड रोडवरील भालगावनजीक अपहरणकर्त्यांची कार बंद पडली. तेव्हा नदीमच्या पायावर गोळी झाडून अपहरणकर्त्यांनी कार सोडून तेथून धूम ठोकली. चिकलठाणा पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत घाटीत दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, निशिकांत भुजबळ, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचेF निरीक्षक अनिल गायकवाड यांनी फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
…..
सीसीटीव्हीत अपहरणकर्ते कैद

बांधकामाच्या ठिकाणावरून नदीमचे अपहरण झाले. त्याच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणकर्ते कैद झाले आहे. कार शिवाय काही जण दुचाकीवर दूर थांबलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सातारा पोलिस, गुन्हे शाखा अपहरणकर्त्यांची शोध घेत आहे.
……….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here