Home सैनिक भारताची ताकद वाढणार, 200 ब्रह्मोस मिसाईल नौदलात दाखल होणार

भारताची ताकद वाढणार, 200 ब्रह्मोस मिसाईल नौदलात दाखल होणार

215
0

आता लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात 200 ब्रह्मोस सूपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र दाखल होणार आहे. केंद्र सरकार लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर देत आहे. वरिष्ठ संरक्षण अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने 200 हून अधिक ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र युद्धनौका, पाणबुडी, विमान किंवा जमिनीवरुन डागता येते. ही क्रूझ क्षेपणास्त्रं युद्धनौकांवर तैनात केली जातील. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त उपक्रमातून या स्वदेशी क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. इंडो-रशियन मोहिमेअंतर्गत भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मॉस्क्वा नदी या दोन नद्यांच्या नावावरुन या क्षेपणास्त्राला नाव देण्यात आलं आहे.

200 ब्रह्मोस मिसाईल नौदलात दाखल क्षेपणास्त्र सामील होतील. संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच हा मोठा करार पूर्ण होईल. हा करार सुमारे 20 हजार कोटीचा असेल. हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडून परवानगीच्या शेवटच्या टप्प्यात असून लवकरच संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

१) ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग ताशी 4321 किमी आहे.
२) यात टू स्टेज प्रोपल्शन सिस्टीम आहे. पहिला सॉलिड आणि दुसरा लिक्विड.
३) रॅमजेट इंजिनमुळे या क्षेपणास्त्राला सुपरसॉनिक गती मिळते आणि इंधनाचा वापर कमी होतो.
४) ब्रह्मोस क्षेपणास्त्र हवेतच मार्ग बदलण्यास सक्षम आहे.
५) हे क्षेपणास्त्र हलणाऱ्या लक्ष्यावर म्हणजे दिशा बदलणाऱ्या लक्ष्यावरही हल्ला करुन नष्ट करण्यात प्रभावी आहे.
६) हे क्षेपणास्त्र 10 मीटर उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम आहे.
७) हे शत्रूच्या रडारमध्ये येणार नाही. कारण यामध्ये कोणत्याही क्षेपणास्त्र शोध प्रणालीला फसवण्याची क्षमता आहे.
७) ब्रह्मोस क्षेपणास्त्र अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्रापेक्षा दुप्पट वेगाने उडते.

भारत-रशिया संबंध मजबूत

भारत आणि रशिया यांचे संबंध अधिक मजबूत झाले आहेत. भारत-रशिया यांची संयुक्त कंपनी ब्रह्मोस एअरोस्पेस कडून या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची स्ट्राईक रेंज 290 वरुन 400 किमी पेक्षा जास्त वाढवण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राच्या सिस्टिममध्ये स्वदेशी सामग्रीचा वापर वाढवण्यात आला आहे. भारतीय उद्योग आणि उत्पादकांचा सहभाग वाढवण्यासाठी यातील अनेक सिस्टिम अपग्रेड आणि स्वदेशी बनवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here