Home अहमदनगर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख मोहनराव चव्हाण कालवश..भक्त परिवारात शोककळा

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख मोहनराव चव्हाण कालवश..भक्त परिवारात शोककळा

20743
0

कोपरगाव : राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम कोपरगाव चे प्रमुख संस्थापक अध्यक्ष शिवभक्त मोहनराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८२ व्या वर्षी दुपारी ४ च्या दरम्यान नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात सुनील, अनिल व संदीप ऊर्फ बाळासाहेब ही तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील ते मुळ रहिवासी होते.
स्व. चव्हाण यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात लिपिक पदापासून सेवा सुरू करून महाव्यवस्थापक पदावर सेवा निवृत्त झाले. ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवित त्यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात मोलाचा सहभाग नोंदवला त्यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सहवासात राहून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.
संत जनार्दन स्वामी महाराज हायात असल्यापासून स्वर्गीय मोहनराव चव्हाण त्यांच्या सहवासात होते पुढे जनार्दन स्वामी यांनाच त्यांनी आपले अध्यात्मिक गुरु केले.
जनार्दन स्वामींच्या महानिर्वाणानंतर त्यांची समाधी जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या इच्छेनुसार कोपरगाव बेट येथे बांधून भव्य मंदिराची निर्मिती केली त्याला जोडूनच काशी विश्वेश्वराचे मंदिर देखील त्यांनी उभारले व बाबाजींचा मोठा भक्त परिवार वाढवण्याबरोबरच सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करून अनेकांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले.
स्वर्गीय मोहनराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता समजताच माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे तसेच बाबाजी भक्त परिवारातून श्री संत रमेश गिरीजी महाराज, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, प्राचार्य राजेंद्र पानसरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, बाबाजी भक्त परिवार, जेऊर कुंभारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नागरिक यांनी शोक व्यक्त केला आहे. स्वर्गीय मोहनराव चव्हाण यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी दहा वाजता जेऊर कुंभारी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here