Home मुंबई अंबादास दानवेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल म्हणाले,शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मंत्री सभा घेण्यातच...

अंबादास दानवेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल म्हणाले,शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मंत्री सभा घेण्यातच व्यस्त

216
0

मुंबई:अवकाळी पावसासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री सभा घेण्यात व्यस्त असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे थोडेही लक्ष नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.अंबादास दानवे म्हणाले की, गेली काही दिवस झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाही, मंत्री केवळ सभा घेण्यात व्यस्त आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून चौथा आणि शेवटचा आठवडा सुरू झाला. मुंबईत माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आस्मानी संकटाबरोबर शेतकरी सुलतानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मी स्वत: राज्यभर शेतकऱ्यांच्य बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांची फार वाईट परिस्थिती आहे, त्या विरोधात आम्ही आवाज उठवणार असेही त्यांनी म्हटले आहे.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सकाळी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. टोपलीत द्राक्ष आणि कांदे घेऊन अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी विरोधकांनी केली. या आंदोलनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे व काँग्रेसचे आमदारही सहभागी झाले होते.कांद्याला भाव मिळालाच पाहीजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.अवकाळी पाऊस, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप केवळ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्थगन विधानसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
अवकाळी पाऊस, शेतीचे नुकसान, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप याबाबत विरोधकांनी सादर केलेला स्थगन प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकारला अवकाळी पाऊस, शेतकरी, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप याबाबत गांभीर्य आहे की नाही?, असा सवाल अजित पवारांनी केला. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here