Home कृषी 3 एकर लागवडीतून केली 6 लाखांची कमाई

3 एकर लागवडीतून केली 6 लाखांची कमाई

585
0

वर्षभर वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत असल्यानं शेती करणे हा तोट्याचा व्यवसाय आहे, असा अनेकांचा समज आहे. काही प्रगतीशील शेतकरी मात्र हा समज खोटा ठरवतायत. सोलापूर जिल्ह्यातील गणपत मदने हे यापैकीच एक आहेत. माळशिरस तालुक्यातील मदने यांच्या आयुष्यामध्ये रेशीम शेतीनं ‘अच्छे दिन’ आले. अवघ्या 3 एकर रेशीम शेतीच्या जोरावर ते लखपती झाले असून त्यांनी घरातील अनेक अडचणी दूर केल्या आहेत.

माळशिरस तालुक्यातील साळमुखवाडी हे गणपत मदने यांचे गाव. त्यांची एकूण 7 एकर शेती आहे. गणपत मदने यापूर्वी पारंपरिक पद्धतीने ऊस, मका, ज्वारी ही पिके घेत. पण खर्च वजा जाता हातात काही मिळत नव्हतं. विशेष म्हणजे ऊस पिकासाठी येणारा खर्च, मिळणारे उत्पन्न आणि लागणारा कालावधी यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांची खूप ओढाताण होत असे.या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी दूध व्यवसायही करून पाहिला. त्यांना 4 मुली आणि एक मुलगा आहे. घरखर्च भागत नसल्याने घरची मंडळी शेजारी रोजंदारीने कामावर जात होती. स्पर्धेच्या युगात मुलांच्या शिक्षणाची आणि भविष्याची चिंता त्यांना सतावत असे.त्यातील 3 एकर क्षेत्रावर रेशीम शेती ते करतात. या शेतीच्या जोरावर त्यांनी सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर मुलींचं लग्नही लावून दिलं.

रामनगरला कोष विक्री केल्याने दरपण चांगला मिळाला. प्रत्येक चिकातून एकरी 50 ते 60 हजार रूपये मिळत होते. अगदी कोरोनाच्या मंदीच्या काळात जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना मी रेशीम शेतीमधून नफा मिळवला आहे. फेब्रुवारी 2023 अखेर गेल्या वर्षभरात मी साधारण 1500 अंडीपुंजाचे संगोपन घेतले आहे आणि त्यापासून 6 लाख रुपये नफा मिळाला, असं मदने यांनी सांगितले.गणपत मदने यांचे दर तीन महिन्याला दोन लॉट विक्रीसाठी जातात. हे कोष सातारा जिल्हा, आत्मा, सोलापूर आणि रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीसाठी जातात. काही कंपन्या शेतावरही येऊन प्रत्यक्ष खरेदी करतात. जूनमध्ये दोन एकर क्षेत्रावर रेशीम शेती वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

‘मी 2017 ला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एक एकर क्षेत्रावर तुती लागवड करून रेशीम व्यवसायाची सुरूवात केली. पहिल्या वर्षी विशेष अनुभव नसल्याने आणि लागणारी औषधी, साहित्य सहज मिळत नसल्यामुळे फार कमी नफा झाला.दुसऱ्या वर्षी आजुबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यास सुरवात केली होती. रेशीम कोष वाहतुकीसाठी सुरवसे भाऊसाहेब यांनी टेम्पो घेऊन कोष विक्री करण्याकरिता कर्नाटकातील रामनगर गाठले. त्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या रेशीम उद्योगाला रंगत येऊ लागली. प्रत्येक आठवड्याला मजुरी, साहित्य खरेदीसाठी अनुदान आणि रेशीम संगोपन गृह यासाठी मला जवळपास पावणेतीन लाख रूपये मिळाले,’ असा अनुभव मदने यांनी सांगितला.

गणपत मदने यांना या कामामध्ये रेशीम अधिकारी आणि समूहप्रमुख यांच्याकडून वेळोवेळी शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळत गेले. या शेतीच्या जोरावरच त्यांनी मोठ्या मुलीचं लग्न लावलं. दोन मुलींचं डी फार्मपर्यंत तर एका मुलीचे एम.एस्सी मॅथपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आज ती मुलगी बँकेच नोकरी करत आहे. तर त्यांचा मुलगा बीएससीचं शिक्षण घेतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here