Home मुंबई अब्दुल सत्तारांचा ‘वर्षा’ बंगल्यावर राडा ; मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’ ला शिवीगाळ !

अब्दुल सत्तारांचा ‘वर्षा’ बंगल्यावर राडा ; मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’ ला शिवीगाळ !

26756
0

मुंबई : एकनाथ शिंदे सरकार स्थापन होऊन शंभर दिवस पूर्ण झालेत. त्याचा आनंदोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडं शिंदे सरकारच्या मंत्री आणि आमदारांची दबंगगिरी सुरूच असल्याचं दिसतंय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काम न केल्याचा राग आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला (ओएसडी) शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळं एकच खळबळ उडालीये.

निवडणूक आयोगानं शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यामुळं राज्याचं राजकारण चांगलाच तापलंय. शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातंय. आता नवं चिन्ह मिळवण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरबैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मंत्री आणि नेत्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीला कॅबिनेटमधील सर्व मंत्री हजर होते. मात्र, या बैठकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय. बैठकीतच अब्दुल सत्तार यांनी आपलं काम केलं नसल्यानं रागाच्याभरात ओएसडीला शिवीगाळ केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच हा प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात शिंदे यांनी मध्यस्थी करत सत्तार यांची समजूत काढली. पण, रागाच्या भरात सत्तार हे बैठकीतून निघून गेले. या घटनेमुळे वर्षा बंगल्यावर काही काळ तणावाचं वातावरण होतं. दरम्यान, ठाकरे गटाने पक्षासाठी तीन नावांचा आणि तीन चिन्हांचा प्राधान्यक्रमानुसार पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. तर, शिंदे गटाचीही रविवारी रात्री बैठक झाली असून यात निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असल्याचं समोर आलं आहे. अशात आता दोन्ही गटांना कोणतं चिन्ह आणि नाव मिळणार याचा फैसला निवडणूक आयोग आज करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here