Home बीड खळबळजनक : बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

खळबळजनक : बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

33341
0

बीड : जिल्हयाच्या राजकारणाला हादरवणारी घटना समोर आली आहे. बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी सर्व बाजूनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली, यामागे काही राजकीय अथवा कौटुंबिक कारण आहे का, याची चौकशी आता पोलीस करत आहेत.

भगीरथ बियाणी यांनी आज दुपारी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बियाणी यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. बियाणी यांचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांनी घरीच स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ शहरातील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पण भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपमध्येही खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात धाव घेतली. कार्यकर्ते आणि पोलिसांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. बियाणी यांच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here