Home इतर छळाला कंटाळून तिने केली ‘आत्महत्या’…!

छळाला कंटाळून तिने केली ‘आत्महत्या’…!

343
0

मराठवाडा साथी न्यूज

परळी : परळी तालुक्यातील पांगरी कॅम्प येथील एका नवविवाहितेने विष पिऊन आत्महत्या केली आणि तिच्या पाठोपाठ लगेच तिच्या पतीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.हि घटना मंगळवारी(२ डिसें.)रात्री उघडकीस आली होती.प्रियांका सायस पंडित(वय १९)आणि सायस पंडित(वय २५)अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.नवरा-बायकोमध्ये शुल्लक कारणाने वाद झाला होता.त्यातून या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे,असा पोलिसांनी संशय व्यक्त केला होता.मात्र,आता मृत विवाहितेच्या वडिलांनी माझ्या मुलीच्या पतीने आणि इतरांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याची तक्रार परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यानंतर तिच्या मृत पतीसह ५ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

प्रियंकाचा विवाह महिन्यांअगोदर(जून महिन्यात)सायस विलास पंडित याच्या सोबत झाला होता.लग्नावेळी १ लाख रुपये हुंड्यापैकी ४० हजार रुपये आणि इतर सामान लग्नात देण्यात आले. त्यानंतर २ महिन्यांनी हुंड्यातील बाकी ६० हजार रुपये आणि घराच्या बांधकामासाठी आणखी ५० हजार रुपये माहेरहून घेऊन ये म्हणून पती सायस पंडित, सासू वेणूबाई विलास पंडित, मावस दीर सुदर्शन गंगाधर पैठणे आणि नणंद बायडी अनिल वाव्हळे यांनी प्रियंकाचा छळ सुरु केला. तिला शिवीगाळ मारहाण करण्यात येऊ लागली. या त्रासाबद्दल प्रियंकाने वारंवार वडिलांना सांगितले.

दिवाळी झाल्यावर सासरी परत जाताना वडिलांनी तिच्या सासऱ्याजवळ अतिशय गरीब परिस्थितीमुळे पैसे देण्यास उशीर होत असल्याचे सांगितले आणि नियोजन झाले कि पैसे देऊत असे आश्वासन दिले. तरीदेखील प्रियंकाचा सासरी छळ होतच राहिला. अखेर सततच्या छळास कंटाळून प्रियंकाने मंगळवारी सायंकाळी ६ वाजता विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर तिचा पती सायस याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली असे प्रियंकाचे वडील अरुण नामदेव गायकवाड (रा. तळेगाव, ता. परळी) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

प्रियांकच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिचा मृत पती, सासू, दीर, मावस दीर आणि नणंद या पाच जणांवर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहा.पोलीस निरिक्षक शहाणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here