Home क्राइम MumbaiNewsUpdate : पूर्व वैमनस्यातून “त्याने” मंदिराला आग लागल्याचा देखावा करून तिघांना पेटवून...

MumbaiNewsUpdate : पूर्व वैमनस्यातून “त्याने” मंदिराला आग लागल्याचा देखावा करून तिघांना पेटवून दिले, आरोपी गजाआड

586
0

मुंबईत साई मंदिराला रविवारी पहाटे लागलेली आग ही दुर्घटना नसून जाणीपूर्वक आग लावल्याची थरकाप उडविणारी  धक्कादायक माहिती चारकोपमधून उघडकीस आली आहे. जुन्या भांडणाचा आणि मारहाण केल्याचा बदला म्हणून आरोपीने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने ” बदले कि आग ” मध्ये तिघांना पेटवून दिल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करून आरोपीविरुद्ध खुनाचा  गुन्हा दाखल करून त्याला औरंगाबादहून अटक करण्यात यश मिळवले आहे तर त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , चारकोपच्या पाखाडी रोड परिसरात असलेल्या साईबाबा मंदिर येथे रविवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली होती. मंदिरात झोपलेल्या सुभाष खोडे, युवराज पवार आणि मन्नू गुप्ता या तिघांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेची चारकोप पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मंदिरामधील वॉटर कुलर आणि एअर कुलरचा एखाद्या ज्वालाग्राही पदार्थामुळे स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. दरम्यान न्यायवैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाकडून त्याअनुषंगाने प्राथमिक अहवाल हाती मिळाल्यानंतर यामध्ये काहीतरी घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक घनःश्याम नायर, सहायक निरीक्षक विक्रम बाबर, जिनपाल वाघमारे, उपनिरीक्षक विजय शिंदे, विजय सावंत यांच्यासह पोलिसांची वेगवेगळी पथके अधिक तपासासाठी तयार करण्यात आली.

दरम्यान आगीमध्ये मृत्यू झालेल्या सुभाष, युवराज आणि मन्नू या तिघांची माहिती काढत असताना याच परिसरात राहणाऱ्या भावेश चांदोरकर याच्यासोबत त्याचे वारंवार भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यातच दोन दिवसांपूर्वी युवराजने भावेशला सिगारेट आणण्यास सांगितले मात्र भावेशने नकार देताच युवराजने त्याला मारहाण केली, असेही काहींनी सांगितले. भावेश आगीच्या घटनेनंतर  गायब झाला  होता. परिसरातील खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुराव्यांवरून औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे असलेल्या भावेशला पोलिसांनी शोधून काढले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भावेशने पोलिसी खाक्या मिळताच गुन्ह्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन मित्राच्या मदतीने तिघांना जिवंत जाळल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भावेश याच्या मनात युवराजबाबत वर्षभरापासून राग खदखदत होता. त्याची हत्या करण्याचे त्याने निश्चित केले होते मात्र संधी मिळत नव्हती. दरम्यान भंडारा असल्याने युवराज रोज मंदिरात झोपत असल्याचे समजताच भावेशने स्वतःच्या दुचाकीतील सुमारे पाच लिटर पेट्रोल एका प्लॅस्टिक कॅनमध्ये काढून ठेवले आणि  पहाटेच्या सुमारास मंदिरात कोणीही नसल्याची संधी साधून अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने त्याने मंदिरात आणि मंदिराभोवती पेट्रोल ओतले आणि मंदिर पेटवून दिले. हे करताना भावेश याचाही हात भाजला. पोलिसांनी अतिशय शिताफीने तपस करून आरोपींना गजाआड केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here