Home परळी वैजनाथ तिसरा डोळा उघडला! आता हयगय नाही…

तिसरा डोळा उघडला! आता हयगय नाही…

2846
0

राख प्रदुषणाबाबत पालकमंत्र्यांचे कारवाईचे निर्देश, पाठोपाठ उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश

दत्तात्रय काळे । परळी

परळी शहर आणि आजुबाजुच्या परिसरात राखेचे प्रदुषण विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राखेचे प्रदुषण थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी नागरीक मागणी करीत होते. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्याय व विशेषे सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे हे स्वत: परळीत होते. त्यांनी महसुल व औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी यांच्याबरोबरच पोलिस अधिकाऱ्यांचची बैठक घेतली. या बैठकीत राखेच्या प्रदुषणाबाबत तात्काळ कारवाईचे आदेश देत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट शब्दांत बजावले आहे.

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी राखेच्या प्रदुषणाचा मुद्दा गांभीर्याने घेत प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुचना दिल्या. राख वाहतूक करणारी वाहने, उघड्यावर राखेचा साठा करणारे साठेबाज यांच्यावर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर तात्काळ याची दखल घेत उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी याबाबतचे आदेश काढत राखेसाठी तालुक्यात कलम १३३ लागू केले आहे. दाऊतपूर येथील राखेच्या तलावातून मोठ्या प्रमाणावर हायवा, टिप्पर व ट्रॅक्टरने राखेचा उपसा होत असुन, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात हे प्रदुषण अत्यंत धोकादायक असल्याने ते थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. येत्या ७२ तासांत राखेचा साठा करणाऱ्यांनी या राखेवर पाणी मारून ती ताडपत्रीने झाकावी, जेणेकरून ही राख हवेत उडणार नाही असे या आदेशात म्हटले आहे.

परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या ट्रंझीट पासशिवाय कोणतेही वाहन रस्त्यावर दिसणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रदेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिस खात्यावर असणार आहे.  उपविभागीय अधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती निवारण कायद्याचे कलम १८८ तसेच भारतीय फौजदारी संहीताचे कलम १३३ (१) ब नुसार संबंधीत दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here