Home तंत्रज्ञान चॅट जीपीटी या नव्या आव्हानाचे शिक्षण क्षेत्रासाठी संधीत रूपांतर करता येईल…

चॅट जीपीटी या नव्या आव्हानाचे शिक्षण क्षेत्रासाठी संधीत रूपांतर करता येईल…

463
0

चॅट जीपीटी (जेनेरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर) चा वापर नुकताच म्हणजे चार महिन्यांपूर्वी, ३० नोव्हेंबर २०२२ अधिकृतपणे सुरू झाला. तेव्हापासून चॅट जीपीटी वापरणाऱ्यांची संख्या जानेवारी २०२३ पर्यंत १०० दशलक्ष इतकी होती तर ज्या ‘ओपन ए वन’ कंपनीने चॅट जीपीटीची निर्मिती केली त्या कंपनीच्या संकेत स्थळाला फेब्रुवारी महिन्यात भेट देणाऱ्या लोकांची संख्या जवळपास २५ दशलक्ष इतकी होती. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे हे माध्यम आहे यात शंका नाही. माहिती तंत्रज्ञानात एक प्रकारचं वादळ आल्यासारखं वाटावं अशी स्थिती आहे. गूगल हा महागुरू आहेच, पण चॅट जीपीटी हे त्यापुढील तंत्रज्ञान आहे. चॅट जीपीटी हे असे टूल आहे की जे प्रश्नांचे विश्लेषण करून रेडिमेड उत्तरे देण्याचे काम करते. हा स्वयंचलित संवाद साधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि भाषा प्रणालीचा वापर केला जातो. सध्या फक्त इंग्रजी भाषेत असलेली ही प्रणाली लवकरच जगभरातील इतर भाषांमध्येही उपलब्ध होईल. भारतात अनेक बँका, प्रवासी कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू विकणाऱ्या उत्पादनसंस्था यामध्ये चॅटबॉट हा ग्राहकांच्या प्रश्नांना व शंकांना उत्तरे देणारा स्वयंचलित उत्तरदाता (आटो रिप्लायर) असतो. चॅट जीपीटीच्या शिक्षण क्षेत्रातील उपयुक्ततेबद्दल आणि त्याच्या अनिष्ट परिणामांबद्दल जगभर चर्चा होत आहे. अमेरिकेतील काही शाळांमध्ये चॅट जीपीटीला बंदी घालण्यात आली आहे तर अशी बंदी कशी अयोग्य आहे यावर तिथे मते व्यक्त होत आहे. एकूणच चॅट जीपीटीमुळे शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेला गदारोळ नेमका काय आहे आणि यातून कोणती आव्हाने निर्माण झाली आहे हे पाहणे हे आजच्या न भूतो न भविष्यती अशा तंत्रज्ञान व माहितीच्या काळात नितांत आवश्यक आहे.

चॅट जीपीटीला आपण प्रश्न विचारू शकतो आणि तो लगेच उत्तरे देतो. विशिष्ट समस्या किंवा प्रश्न याबाबतचे चॅट निर्माण करून त्यासंबंधीची उत्तरे आपल्याला मिळू शकतात. विशिष्ट विषयातील तज्ज्ञ व्यक्तीशी बोलण्यासारखे हे आहे. किंबहुना प्रचंड ज्ञानासाठा असलेल्या एखाद्या सुपर ह्युमनशी बोलण्यासारखे हे आहे. तुम्ही मागणी करताच तो कोणत्याही विषयावर निबंध वा प्रबंध, कविता, गोष्टी, ब्लॉग, गणिती प्रमेये, विज्ञानातील किंवा संगणकातील कूट संकल्पना क्षणार्धात सादर करू शकतो. चॅट जीपीटीवर गणिताची कोडी सोडविता येतात, कवितेचा विषय दिल्यास यमक जुळवून कविता तयार होते. (कुणीही आता कविता अन् त्याही इंग्रजीत करू शकतो !) सॉफ्टवेअरचे कोडिंग मिळते. विज्ञान, रसायन, भाषा किंवा कुठल्याही विषयावर तयार उत्तरे मिळतात. गूगलवर संकेत स्थळे मिळतात आणि संकेत स्थळावर जाऊन मग ती माहिती संकलित करावी लागते किंवा माहितीचे विश्लेषण करता येते. चॅट जीपीटी तुम्हाला थेट उत्तरेच टेक्स्ट स्वरूपात देते. उत्तरांमध्ये बदल (रिजनरेट) करता येण्याची सोय आहे. शिक्षकांना लेसन नोट्स काढता येतात. या सगळ्यामुळे विषय किंवा भाषा समजून न घेता’ कॉपी -पेस्ट’ करण्याकडे कल वाढेल आणि नवोन्मेष किंवा नवनिर्मितीला खीळ बसेल असा काहीसा टीकेचा सूर दिसून येतो. तथापि यावर चॅट जीपीटीवर बंदी घालणे हा मार्ग असू शकत नाही. कारण शालेय वा महाविद्यालयांच्या संगणकावर चॅट जीपीटीला जरी बंदी घातली तरी लॅपटॉप, स्मार्ट मोबाइल, टॅबलेट या माध्यमांमध्ये चॅट जीपीटीचा वापर केला जाऊ शकतो. चॅट जीपीटीच्या काही मर्यादा आहेत. २०२१ नंतरचा डेटा यात उपलब्ध नाही. तसेच काही प्रश्नांची उत्तरे अचूक असतील असे नाही. चॅट जीपीटीच्या मुख्य पृष्ठावर ही बाब नमूद केली आहे.

इंटरनेट आणि संगणक क्रांतीमुळे अध्ययन आणि अध्यापन यात आमूलाग्र बदल झाल्याचे आपण अनुभवत आहोत. या क्रांतीने शिक्षणाची सार्वत्रिकता वाढली आणि ज्ञानदानातील मक्तेदारीही संपली. शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांचे अध्ययनातील कार्य क्षेत्र विस्तारले. ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे अनिवार्य झाले. शिक्षकाचेही ज्ञान आणि माहिती तपासण्याची सोय विद्यार्थ्यांनाही उपलब्ध झाली. कोसळणाऱ्या प्रचंड माहितीचा उपयोग कसा करायचा आणि सकस निवडून निःसत्त्व कसे आणि का टाकून द्यायचे हे शिकवणे शिक्षकांना क्रमप्राप्त आहे. म्हणजेच एक प्रकारे प्रवर्तकाची (फॅसिलिटेटर ) भूमिका शिक्षकाला करायची आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही आता तंत्रज्ञानावर अधिक विसंबून राहावे लागणार आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, सर्वच प्रश्न चॅट जीपीटी सोडवत असेल तर मग शिक्षकाची आवश्यकता काय ? विद्यार्थ्यांना जो गृहपाठ (असाइनमेंट) दिला जातो अथवा विद्यार्थ्यांकडून वर्गात जो अभ्यास करून घेतला जातो. त्यात चॅट जीपीटीची ही सहजप्राप्त उत्तरे मिळाल्यास आकलन आणि सर्जनशीलता या अध्ययनाच्या मूळ हेतूस बाधा येऊ शकते. शिक्षकाला यंत्र पर्याय होऊ शकत नाही. कारण अध्यापनाच्या असंख्य संभाव्यता अध्ययन प्रक्रियेत असतात. टाळेबंदीच्या काळात केवळ मोबाइल आणि लॅपटॉपवर शिकावे आणि शिकवावे लागल्याने मुलांच्या मानसिकतेत कसा बदल झाला आणि अध्ययनाचा कसा बट्ट्याबोळ झाला हे आपण अनुभवले आहे. उमलत्या वयातील मुलांचे अनेक भावनिक प्रश्न असतात. विद्यार्थी आणि शिक्षकाच्या निकोप संबंधातून या दोहोंच्या व्यक्तित्वाचा विकास होतो. नावीन्याची प्रेरणा, सर्जनशीलता इत्यादी गुणांचा सहज परिपोष शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होतो. मशीनबरोबर हा शिक्षक नावाचा माणूस हवा. माणूस आणि मशीन यात हा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत शिक्षकाचे शिक्षण व्यवस्थेत स्थान राहील. म्हणून चॅट जीपीटीला एक उत्तम शिक्षणपूरक साधन म्हणून कसा वापर करता येईल याचा आत्तापासूनच शिक्षकांनी विचार केला पाहिजे. इंटरनेट आणि संगणक जसे व्यवस्थेचा भाग बनलेत तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता येत्या काही दिवसात समाजाचा एक अपरिहार्य भाग बनणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवन संपल्यावर तरुणांना येत्या काही दिवसात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगातच वावरावे लागणार आहे. तेव्हा या साधनाचे भले बुरे उपयोग त्यांना कळले पाहिजेत. यासाठीदेखील चॅट जीपीटीचा अनुभव मिळणे ही काळाची गरज आहे. पुढच्या पाच वर्षाच्या काळात चॅट जीपीटीसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने शिक्षणाच्या क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होईल. याचा आपण कसा वापर करून घेतो आणि अध्ययन आणि अध्यापन यात कसे बदल घडवतो यावर आपल्या देशातील कोट्यवधी तरुणांचे आयुष्य भविष्याला सामोरे जाणार आहे.

                                                                                                         डॉ. सतीश श्रीवास्तव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here