Home मुंबई मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या नामकरणाला पुन्हा जोर;जिल्ह्याच्या या सुपुत्राचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला...

मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या नामकरणाला पुन्हा जोर;जिल्ह्याच्या या सुपुत्राचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे

373
0

ठाणे: भारतीय रेल्वेचे जनक आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्याच्या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे. यासंदर्भात ठाणे जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यावर पंतप्रधानांच्या अनुमतीसाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी दिली.मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट टर्मिनस नामकरण करण्यासाठी दैवज्ञ समाज तसेच नाना शंकरशेट प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने २० मार्च २०२० रोजी नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तत्कालीन रेल्वे उपसंचालकांना नामकरण करण्यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश रेल्वे राज्यमंत्री यांच्या कार्यालयाने दिले होते; मात्र आजतागायत या नामांतराचे घोंगडे भिजत पडले आहे. नामांतराच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संजय पितळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन दिले. त्यावर तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा, असा शेरा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील असून, त्यांचे घोडबंदर रोड गावात काही काळ वास्तव्य व येणे-जाणेही होते. तेथे त्यांचा जुना वाडा आणि त्यांनी स्थापन केलेले शंकराचे मंदिरदेखील आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या या सुपुत्राचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे, अशी मागणी होत आहे. ठाण्याचे आमदार संजय केळकर तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here