Home मुंबई खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची ‘दिवाळी’ ; प्रवाशांचे ‘दिवाळे’

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची ‘दिवाळी’ ; प्रवाशांचे ‘दिवाळे’

22946
0
बसचा फोटो प्रतीकात्मक आहे.

गावाकडे पोहोचेपर्यंत खिसा रिकामा, तिकिट दर भिडले गगनाला

औरंगाबाद : प्रमोद अडसुळे
दिवाळीला प्रवाशांची वाढती गर्दी पाहता खासगी ट्रॅव्हल्स चालकांची आतापासूनच तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केल्याचे दिसून येत आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांना नियमानुसार एसटी बसच्या दीडपट तिकीट घेता येते; मात्र ट्रॅव्हलसचे तिकीट दर हे प्रमाणाबाहेर वाढविण्यात आल्याने ऐन सणासुदीत प्रवाशांचा खिसा गावाकडे पोहोचेपर्यंत रिकामा होणार आहे. एसटी व रेल्वेच्या गाड्यांचे बुकिंग ‘फुल्ल’ झाल्यामुळे दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालक दुप्पट-तिप्पट तिकीट दर घेत आहेत. या लूटमारीकडे वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई येथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्वच ट्रॅव्हलस चालकांनी दिवाळीत तिकीट दर नियमापेक्षा अधिक वाढविले आहेत. ऑनलाईन बुकिंग करताना हे दर सर्वांनाच दिसतात मात्र, आरटीओ अधिकाऱ्याना का दिसत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे.
नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून अनेकजण हे औरंगाबाद, पुणे मुंबई, नागपूर अशा शहरात वास्तव्यास आहेत. दिवाळीसाठी बरेचजण गावाकडे जातात. पुण्यात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भातील नागरिकांची संख्या मोठी असून, त्यांना घरी जाता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. एसटी बस, रेल्वेचे दिवाळी अगोदर दोन ते तीन दिवसांचे बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचाच पर्याय राहिला आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून दिवाळीच्या तोंडावर तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केल्याचे दिसून येत आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांना नियमानुसार एसटी बसच्या दीडपट तिकीट घेता येते; मात्र त्यांनी दर प्रमाणाबाहेर वाढविले आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रवासासाठी हजारो रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे गावी जावे की नाही? गेले तर गावाकडे पोहोचेपर्यंत खिसा रिकामा होणार असल्याने नागरिक संकटात सापडले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष दिले तर मनमानी पद्धतीने वाढविण्यास आलेले तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊन दिवाळी घरच्यांसोबत आनंदाने साजरी करू शकतील.

प्रवाशांचे हाल

  • पुणे, औरंगाबाद येथून लातूर, बीड, परळी, अंबाजोगाई, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या भागात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
  • या ठिकाणी जाणाऱ्या स्लिपर खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दुप्पटीपेक्षा जास्त झाल्याचे दिसून येत आहे.
  • दिवाळीच्या तोंडावर तिकीट दरात मोठी वाढ झाल्याचे ऑनलाइन बुकिंग करताना दिसत आहे.
  • पुण्यावरून परळीला जाण्यासाठी एरवी ४०० ते ५०० रुपये तिकीट असते. पण, आता थेट दोन ते अडीच हजार रुपये तिकीट झाले आहे.
  • लातूर, उस्मानाबादसाठी एरवी ८०० ते ९०० रुपये असलेले तिकीट थेट दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत गेले आहे.

शहरानुसार तिकीटदरांत झालेली वाढ

मार्गाचे नाव आठवड्यापूर्वीचे तिकीट २१ ऑक्टोबरचे दर

पुणे – लातूर ८००-१००० १७००-१९००

पुणे – नांदेड ८००-१००० २१००-२६९९

औरंगाबाद – पुणे ६०० – ९०० १५००- २०००

पुणे – परळी ४०० -५०० २००० – ३०००

औरंगाबाद – लातूर ३०० – ५०० १००० – १३००

पुणे – परभणी ७०० – ८०० १८००- २५००

शेकडो नादुरुस्त बस धावताहेत रस्त्यावर

नाशिक येथे झालेल्या बस जळीत घटनेनंतर परिवहन विभागाने सर्वच खाजगी बसची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. राज्यभरात रस्त्यावर शेकडो बसेस या धोकादायक अवस्थेत प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर येत आहे. खाजगी बसमध्ये वाहतूक नियमांचे पालनच होत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, धोकादायकरित्या प्रवाशांची वाहतूक करणे असे प्रकार सर्रास होत असल्याचे समोर आले आहे. खासगी प्रवासी आराम बस आणि डंपर यांची धडक झाल्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीत प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच नाशिक येथे घडली होती. दुर्घटनाग्रस्त बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत होती. त्यामुळे आरटीओ विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here