Home अहमदनगर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा उसाला अडीच हजाराचा भाव

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा उसाला अडीच हजाराचा भाव

17876
0

कोपरगाव / किसन पवार

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा यावर्षीच्या गाळप ऊसाला २५००/- रुपये प्रति टन भाव, कामगारांना १२ टक्के वेतनवाढी सह मागील वर्षी इतकाच बोनस आणि ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून या वर्षाचा ६७ वा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे व त्यांच्या पत्नी सौ पुष्पाताई काळे यांचे शुभहस्ते विधीवत पूजा करून गव्हाणीत मोळी टाकण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात श्री. काळे म्हणाले की, पुढील हंगामात कारखान्यांची क्षमता वाढून प्रति दिन ६ हजार ते ७ हजार ५०० टन ऊस गाळप करणे शक्य होईल तसेच या आधुनिकीकरणात ऑटोमायझेशन जास्त प्रमाणात असल्यामुळे उत्पादन खर्चात देखील बचत होणार आहे. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुधाकर रोहोम, ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, पद्मकांत कुदळे, एम.टी. रोहमारे, संभाजी काळे, हरिभाऊ शिंदे, पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे आदीसह कारखान्याचे संचालक, अधिकारी, उद्योग समूहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व पदाधिकारी, कोपरगाव नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सभासद व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की मागील दोन हंगामामध्ये ऊस उत्पादन व साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले मात्र साखर निर्यातीस दिलेला सकारात्मक प्रतिसाद व इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात आल्यामुळे साखर साठे नियंत्रित ठेवता आले. अन्यथा साखरेचे दर घसरले असते मात्र साखर कारखानदारी आर्थिक नियोजन करुन दिवसेंदिवस व्यवसायाभिमुख व जागतिक बदलास प्रतिसाद देत मार्गक्रमण करीत आहे. चालू गाळपाच्या ऊसाला प्रतिटन २५००/- रुपये दर व जर परिस्थिती चांगली असेल तर पुढे अजून विचार करता येईल तसेच कारखाना कामगारांना देखील मागील वर्षी प्रमाणे बोनस व १२ टक्के वेतन वाढ देण्याचे त्यांनी सांगितले मात्र कोविड काळातील लॉक डाऊन मध्ये साखर विक्री व उपपदार्थ विक्रीवर परिणाम झाल्यामुळे ऊस उत्पादकांना दिवाळी देता येत नसल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर दिसून आला दादांनी दिवाळीला काहीतरी द्यायला पाहिजे होते दादांकडून अपेक्षा होती अशी कुजबूज शेतकरी वर्गातून ऐकायला मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर व्हाईस चेअरमन सुधाकर रोहोम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here