Home मुंबई मुंबईत आजपासून ‘जी-२०’ बैठक, देशविदेशातील प्रतिनिधी राहणार उपस्थित

मुंबईत आजपासून ‘जी-२०’ बैठक, देशविदेशातील प्रतिनिधी राहणार उपस्थित

392
0

मुंबई : मुंबईत डिसेंबरनंतर पुन्हा एकदा जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, बुधवार व गुरुवार असे तीनदिवसीय व्यापार व गुंतवणूक बैठकींचे आयोजन करण्यात आले असून या बैठकींना देशविदेशातील प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने महापालिकेकडून वांद्रे, सांताक्रूझ, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड, मिठी नदी आदी ठिकाणांचे सुशोभीकरण व अतिरिक्त रस्ते कामे केली जात आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मुंबई पुन्हा चकचकीत होणार आहे.पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सोमवारी या कामांची पाहणी केली. परिषदेच्या व्यापार व गुंतवणूक समूहाची बैठक मुंबईत आज, मंगळवार २८ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत होत आहे. या निमित्ताने पालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेत चहल यांनी संबंधित विभागांना कामे पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले. परिषदेची पहिली बैठक मुंबईत डिसेंबर २०२२मध्ये झाली होती. त्यावेळी पालिकेने केलेल्या शहर सुशोभीकरण कामांची केंद्र सरकारनेदेखील वाखाणणी केली होती. या परिषदेच्या निमित्ताने मुंबईचे पर्यायाने महाराष्ट्राचे ठळक स्थान बैठकांवेळी अधोरेखित व्हावे, म्हणून पालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
बैठकांची ठिकाणे व अभ्यागत राहणार असलेल्या हॉटेल्स परिसरांमध्ये सुशोभीकरण, स्वच्छता यादृष्टीने पालिकेने विशेष कामे केली आहेत. ग्रॅण्ड हयात हॉटेल (सांताक्रूझ) ते ताज लॅण्ड्स एण्ड (वांद्रे) परिसर यासह सांताक्रूझ, कलिना परिसर, कलानगर, वांद्रे-कुर्ला संकूल, मिठी नदी परिसर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभाग कार्यालय परिसर, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड परिसर आदी परिसरांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व ठिकाणच्या कामांची पाहणी करण्यासाठी चहल यांनी सकाळी दौरा केला. अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वाळंजू आदी अधिकाऱ्यांसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह आयुक्त राममूर्तीदेखील या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.जी-२० बैठकांच्या परिसरांमध्ये रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची अतिरिक्त कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच उद्यान विभागाने ठिकठिकाणी हरित सुशोभीकरण केले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्व परिसरांत विशेष मोहीम राबवून स्वच्छतेची कामे पूर्ण केली आहेत. ठिकठिकाणी चौकांमध्ये तसेच पथदिव्यांच्या खांबांवरही रोषणाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here