Home क्राइम चहाविक्रेत्या मावशींचा ‘आधारवड’ कोसळला…!

चहाविक्रेत्या मावशींचा ‘आधारवड’ कोसळला…!

676
0

मराठवाडा साथी न्यूज
पुणे:
प्रभात रस्त्याकडून कॅनॉल रस्त्याकडे जाणाऱ्या कोपऱ्यावर शुक्रवारी चहा पिणाऱ्यांची वर्दळ नव्हती. झाडाखाली वाफाळता चहा, खाऊ विकणाऱ्या मावशी आणि काकांची अनुपस्थिती येथून जाणाऱ्या आणि हटकून चहाचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत भरत होती. दुकान पंधरा दिवस बंद राहील, असा झाडाखाली टांगलेला फलक लक्ष वेधून घेत होता. गुरुवारी ‘सीरम इन्स्टिट्यूट’मधील आगीने वीस वर्षांच्या प्रतीकचा बळी घेतल्याने पाष्टे पती-पत्नीच्या आयुष्याचा कणाच नाहीसा झाला. त्यामुळे कालपर्यंत कष्टाने आनंदी जीवन जगणारे कुटुंब पूर्णपणे मोडून पडल्याचे चित्र होते.’सीरम’च्या इमारतीला गुरुवारी लागलेल्या आगीत प्रभात रस्त्याच्या चौदाव्या गल्लीत छोट्या खोलीत राहणाऱ्या प्रतीक पाष्टे या तरुणाला जीव गमवावा लागला. ‘त्या’ पाच मृतांपैकी एक प्रतीक असल्याचे वृत्त धडकताच या भागात शोककळा पसरली. पाष्टे मावशींकडे चहा प्यायला येणाऱ्या लोकांची गुरुवारपासून ये-जा सुरू होती. हिरवाई उद्यानासमोरील कॅनॉल रस्त्यावर झाडाखाली चहा विकणाऱ्या, छोट्याशा खोलीत पत्नी-पत्नी आणि दोन मुले असा चौघांचा संसार मोडून पडल्याने येणारा-जाणारा हळहळत होता.
‘प्रतीक सकाळी दुकान लावून द्यायचा आणि कामावर जायचा. आमच्या कुटुंबासाठी खूप वाईट झालं,’ प्रतीकच्या आई नूतन पाष्टे हुंदका गिळून बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. धड चार लोकही बसू शकणार नाहीत, अशा खोलीत माणुसकीच्या नात्याने आलेला प्रत्येकजण त्यांना धीर देत होता. ‘मूळचे चिपळूणचे बहिणीचे कुटुंब वीस वर्षांपासून येथे चहा विकण्याचा व्यवसाय करीत आहे. कष्ट करून जगणाऱ्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. प्रतीकच्या वडिलांना दोन दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल केल्याने त्यांना ही बातमी सांगितलेली नाही. मोठ्या भावाच्या मृत्युमुळे सातवीत शिकणारा प्रज्ज्वल भेदरला आहे. ज्याला अंगाखांद्यावर खेळवले त्याला निरोप द्यायची वेळ आमच्यावर आली…’ या शब्दांत प्रतीकचे मामा गणेश आणि योगेश घाणेकर यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here