Home मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधानसभेत आश्वासन;३१ मार्चच्या आत शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधानसभेत आश्वासन;३१ मार्चच्या आत शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार

407
0

मुंबई:विधानसभेत मंगळवारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. यावेळी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना कधीपर्यंत ही रक्कम मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता , ३१ मार्चपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासाठी एक निश्चित तारीख तुम्ही सांगाअशी मागणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी तारखेची घोषणा केली हे विशेष.मंगळवारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याची बाब सदनाच्या निदर्शनास आणून देत ही मदत कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सदनात माहिती देताना सांगितले की, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी ७५५ कोटींचे वाटप झाले आहे. यात ३३०० कोटींची अतिरिक्त मागणी आलेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तींच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या ६८०० कोटींपैकी ६००० कोटींचे वाटप झाले आहे, ८०० कोटीं बाकी आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांच्या अनुदानापोटी४७००कोटींचे वाटप झाले आहे अशी माहिती दिली. सरकारने ६.९० लाख शेतकऱ्यांना एका क्लिकमध्ये २५०० कोटी रुपये दिले असे मुख्यमंत्री म्हणाले. उर्वरित रक्कम लवकर शेतकऱ्यांना देऊ असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना ही मदत नेमकी कधी जमा करणार याची निश्चित तारीख सांगा अशी मागणी केली. अजित पवार म्हणाले की, ४७०० कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे मुख्यंमंत्री सांगत आहेत, नक्कीच झाले असतील. मात्र अजून मोठा वर्ग वाटपापासून वंचित आहे. अशा शेतकऱ्यांना आपण सभागृहात एक निश्चित तारीख सांगा. कदाचित पुरवणी मागण्यांत सहकार विभागाने १०००कोटी रुपये दाखवले आहेत ते यातील असू शकतात. आजही राज्यात तुम्ही आढावा घेतल्यास या मोठा वर्ग यापासून वंचित असल्याचे तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल याची एक तारीख तुम्ही सदनात सांगा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ मार्चच्या आत शेतकऱ्यांनाअतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here