Home राजकीय मोठी बातमी ! महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

मोठी बातमी ! महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

232
0

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचं बळ वाढलं आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आता महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्रच लढण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. त्यानुसार शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. तसेच आपआपल्या कोट्यातूनच मित्र पक्षांना जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान मिळणार नसल्याचं सध्या तरी चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. या फॉर्म्युल्यानुसार 48 जागांपैकी शिवसेनेला 21, राष्ट्रवादीला19 आणि काँग्रेसला 8 जागा मिळणार आहेत. या जागा कोणत्या असतील हेही आघाडीचं ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे. या शिवाय आपापल्या मित्रपक्षांना स्वतःच्या कोट्यातून जागा द्याव्यात असंही महाविकास आघाडीचं ठरलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला ठाकरे गटाच्या कोट्यातून जागा मिळणार आहे. वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळणार नसल्याचं सध्याचं तरी चित्रं असल्याचं सांगितलं जात आहे.

पाच ते सहा जागांवर एकमत न झाल्याने त्यावर पून्हा चर्चा होणार आहे. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहे. त्यापैकी ठाकरे गट 4 जागा लढणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे. मुंबईत ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याने ठाकरे गटाला चार जागा सोडण्याचा निर्णय झाला आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात ठाकरे गट निवडणूक लढणार आहे. तर ईशान्य मुंबईमधून राष्ट्रवादी आणि उत्तर मुंबईमधून काँग्रेस लढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत प्राथमिक बोलणी झाली आहे. आघाडीच्या नेत्यांची चर्चेची आणखी एक फेरी होणार असून त्यात अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. विधान परिषद आणि पोटनिवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत नेत्यांमध्ये एकत्र निवडणूक लढण्यावर एकमत झालं होतं. त्यानुसार आघाडीने जागा वाटपाचा मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीने कोणत्याही परिस्थितीत भाजपला पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एकभाग म्हणून आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here