Home Uncategorized अशोक चव्हाण, जयंत पाटलांकडून शिवसेना जिल्हाप्रमुखांची अडवणूक!

अशोक चव्हाण, जयंत पाटलांकडून शिवसेना जिल्हाप्रमुखांची अडवणूक!

391
0

राज्यातील ज्या जिल्ह्यात शिवसेनेचा पालकमंत्री नाही, अशा जिल्ह्यांत शिवसेना पदाधिकाऱ्यांची व आमदारांची कामे मार्गी लावण्यासाठी सेनेच्या इतर मंत्र्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे, तसा शब्द शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिला आहे. मंगळवारी रात्री १० ते एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद साधला. त्याला ८० जिल्हाप्रमुखांची उपस्थिती होती.

राज्यात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे पालकमंत्री जिल्ह्यातील शिवसेनेची कामे मार्गी लावत नाहीत, अशा तक्रारी या बैठकीत उद्धव यांच्याकडे झाल्या. नांदेड, सोलापूर आणि सांगली या सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी त्यासंदर्भात तक्रारींचा पाढा वाचला. नांदेडचे पालकमंत्री काँग्रेसचे अशोक चव्हाण, सोलापूरचे राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आणि सांगलीला राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे पालकमंत्री आहेत. या नेत्यांकडून जिल्ह्यात सेनेची अडवणूक होत असल्याचे जिल्हाप्रमुखांचे म्हणणे होते. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे दोनच मंत्री आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादीकडून सेनेची मोठी अडवणूक होत असल्याच्या तक्रारी जिल्हाप्रमुखांनी केल्या. पुढच्या महिन्यात म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाची वर्षपूर्ती आहे. एका वर्षात सरकारने मार्गी लावलेली कामे जनतेपर्यंत पोचवा, अशा सूचना उद्धव यांनी बैठकीत दिल्या. दरम्यान, यानंतर आता महाविकास आघाडीत कुरबुरी होण्याची शक्यता आहे.

सेना पदाधिकाऱ्यांची आघाडी सरकारात गोची

शिवसेनेच्या आमदारांची व पदाधिकाऱ्यांची कामे मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात नेमणूक होणार होती. मात्र, त्यात अनेकांनी खोडा घातल्याने ती झाली नाही. परिणामी सेना पदाधिकाऱ्यांची आघाडी सरकारात गोची होत आहे. या बैठकीत खासदार विनायक राऊत आणि खासदार अनिल देसाई सहभागी होते. यापूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनीसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्पात तरतूद केलेला जिल्ह्याचा निधी देत नाहीत, अशा तक्रारी उद्धव यांच्याकडे केल्या आहेत. उद्धव यांनी टाळेबंदीच्या काळात सेनेच्या मंत्र्यांच्या तसेच पक्षाच्या आमदारांच्या विभागवार बैठका घेतल्या आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्याचाच भाग म्हणून ८० जिल्हाप्रमुखांची मंगळवारी रात्री बैठक पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here