Home राजकीय बाळासाहेब ठाकरेंचा बाबरी पाडण्याशी संबंध नाही

बाळासाहेब ठाकरेंचा बाबरी पाडण्याशी संबंध नाही

441
0

१९९२ च्या डिसेंबर महिन्यात बाबरी मशीद पाडण्यावरून निर्माण झालेला वाद अद्याप शमण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयानं २०१९मध्ये बाबरीसंदर्भात ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर त्यावर पडदा पडेल असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, अजूनही राजकीय वर्तुळात बाबरी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात नव्याने दावा केला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाकडून भाजपावर टीकास्र सोडण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. “त्यावेळी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? हे जनरलाईज करण्याची गरज नाही. कारसेवक हे हिंदू होते. कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की हेच करू शकतील आणि त्यांनी केलं ते. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अयोध्येतील सगळा गोंधळ संपल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण तिथून बाहेर पडल्याचं चंद्रकांत पाटील या मुलाखतीत म्हणाले आहेत. “मला तर महिनाभर तिथे नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, आता विधानपरिषदेत असणारे हरेंद्र कुमार आणि मी असे रांगेनं तीन राष्ट्रीय सरचिटणीस महिनाभर संध्याकाळच्या सभा, संतांची व्यवस्था हे सगळं बघायला तिथे होतो. आम्हाला असं सांगितलं होतं की बाबरी पडो वा न पडो, शेवटचा माणूस बाहेर पडल्यानंतर तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं. जेव्हा आम्ही तिघं बाहेर पडलो, तेव्हा अयोध्येच्या त्या रस्त्यांवर कुत्री भुंकत होती. अशा वातावरणात आम्ही काम केलं. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे तुम्ही काय तुमचे सरदार पाठवले होते का तिथे?” असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना टीकास्र सोडलं आहे. “अयोध्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीत हिंदुत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला संघर्ष आणि त्याग या देशाला माहिती आहे. त्याच त्यागातून आजचा भाजपा निर्माण झाला आहे. आज जो भाजपा सत्तेत आलेला दिसतोय, त्यात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यावेळच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे बाबरी कांडानंतर लखनौला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर झाले आहेत. त्यातले ते प्रमुख आरोपी आहेत. हे भाजपाच्या नेत्यांना माहिती नाही का? ज्यांना तुम्ही विकत घेतलंय, त्यांच्या तोंडाला कुलूप का लागलंय?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here