Home देश-विदेश जो बायडेन यांची पहिल्याच दिवशी “Action “

जो बायडेन यांची पहिल्याच दिवशी “Action “

477
0

अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी आपापल्या पदांची शपथ घेतली. ‘आजचा दिवस अमेरिकेसाठी आणि लोकशाहीसाठी अमूल्य आहे’ असे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. या शपथविधीनंतर अवघ्या काही तासांमध्ये बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्यास सुरुवात केली आहे. बायडेन यांनी पहिल्या दिवशी संध्याकाळी ओव्हल येथील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात हजेरी लावत १७ अध्यादेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यापैकी जवळजवळ सर्वच निर्णय हे ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय असून ते रद्द करण्यात आले आहेत.

बायडेन यांनी वातावरण बदलाशी लढण्यासाठी अंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची सर्वात महत्वपूर्ण घोषणा करत या करारामधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा ट्रम्प यांचा निर्णय मागे घेतला आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये पुन्हा सहभागी करुन घेण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराच्या माध्यमातून अमेरिका हवामानासंदर्भातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांना तोंड देणार असून आधी हे आम्ही कधीही केलेलं नाही, असं बायडेन यांचं म्हणणं होतं. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही या करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय बायडेन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले इतरही काही निर्णय रद्द केलेत.

करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अध्यादेश जारी

सर्वसामान्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत देण्यासंदर्भातील घोषणा

पॅरिस हवामानबदल करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी

वर्णद्वेष संपवण्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय

अमेरिका आणि मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रद्द केला. या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा निधी थांबवण्यात आला

जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सभासदांमधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्द करण्यात आलाय.

ट्रम्प प्रशासनाने मुस्लीम आणि आफ्रिकन देशांवर घातलेली बंदी हटवण्यात आली

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली. यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही दिलासा

वरील सर्व निर्णय बायडेन यांनी घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here