Home औरंगाबाद बलात्कारप्रकरणी २० वर्षे सक्तमजुरी

बलात्कारप्रकरणी २० वर्षे सक्तमजुरी

145
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद: शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला जालना येथील एका मोकळ्या मैदानावर नेत तिच्यावर बलात्कार करणारा नराधम आरोपी रवींद्र विश्वनाथ भालेराव (वय २५, शेंद्रा झोपडपट्टी, आंबेडकर चौक) याला २० वर्ष सक्‍तमजुरी व विविध कलमांखाली एकूण ३७ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली. विशेष म्हणजे आरोपी हा फिर्यादी कुटुंबाच्या ओळखीचा असून, त्याने पीडितेचे वडील अंध असल्याचा व ओळखीचा फायदा घेत हे घृणास्पद कृत्य केले.

प्रकरणात १३ वर्षीय पीडितेच्या आईने फिर्यादी दिली होती. त्यानुसार, १४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी आठ वाजता फिर्यादी व तिचे दोन्ही मुले, नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. घरी फिर्यादीचा अंध पती व १३ वर्षीय मुलगी होती. सायंकाळी फिर्यादीच्या मुलाने पीडिता हरवली असल्याचे सांगितले. फिर्यादीसह कुटुंबाने तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी पीडिता ही करमाड येथे असल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. त्यानुसार फिर्यादी पीडितेला घरी घेवून आली. फिर्यादीने पीडितेला विश्वासात घेवून विचारपूस केली. १४ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी अडीच वाजता पीडिता चिप्स आणण्यासाठी दुकानात जात असताना आरोपीने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला सिडको बसस्थानक येथे आणले व तेथून जालन्याकडे घेवून गेला. रात्री जालन्यातील सरकारी रुग्णालयाच्या मैदानात नेत पीडितेला आई-वडील व भावांना जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. घटनेनंतर पीडिता बेशुद्ध पडली, तर आरोपीने तिला तेथे सोडून पळ काढला. दुसऱ्या दिवशी पीडिता स्वत: चालत करमाडला पोहचली. तेथे एका काळ्या-पिवळीच्या चालकाला आपण हरविल्याचे सांगितले व घरी सोडण्याची विनंती केली. त्यानुसार चालकाच्या मदतीने फिर्यादीने पीडितेला घरी आणले. प्रकरणात ‘एमआयडीसी’ सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्यात पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्‍ता विनोद कोटेचा आणि ज्ञानेश्वरी नागुला (डोली) यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात पीडितेसह फिर्यादीचा जबाब महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी रवींद्र भालेराव याला पोक्सोचे कलम ४ अन्वये वीस वर्ष सक्‍तमजुरी २० हजार रुपये दंड, पोक्सोचे कलम ८ अन्वये तीन वर्षे सक्‍तमजुरी, पाच हजारांचा दंड, भादंवी कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सक्‍तमजुरी, एक हजार रुपये दंड, कलम ३७६ अन्वये दहा वर्षे सक्‍तमजुरी, दहा हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्वये तीन महिने सक्‍त मजूरी, एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here