Home मुंबई पाणीकपातीतून १२ तासांची सूट…..!

पाणीकपातीतून १२ तासांची सूट…..!

242
0

मराठवाडा साथी न्यूज
ठाणे : लघु पाटबंधारे विभागाच्या आदेशानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच स्टेम कंपनीने महिन्यातून दोनदा २४ तास पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कपातीची झळ ठाणेकरांना बसू नये यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन आखण्यास सुरुवात केली असून बंदच्या काळात महापालिका स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा विभागवार बारा तास सुरू ठेवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे ठाणेकरांना १२ तासांचीच पाणीकपात सोसावी लागणार आहे. असे असले तरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात केवळ एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असल्याने या ठिकाणच्या नागरिकांची पाणीकपातीतून सुटका होणार नाही. ठाणे जिल्ह्य़ातील बारवी आणि आंध्र धरणातील पाणी उल्हास नदीत सोडण्यात येते. या नदीपात्रातून एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण पाणी उचलून त्याचे शहरांमध्ये नियोजन करते. या दोन्ही धरणांमधील पाणीसाठा येत्या १५ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या कपातीमुळे एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाने महिन्यातून दोनदा २४ तास शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांचे हाल होण्याची शक्यता पाहून, ठाणे महापालिका प्रशासनाने आता पाणीपुरवठय़ाचे नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे.
कपातीच्या काळात पाणीपुरवठय़ाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी स्टेम प्राधिकरणाकडून, तर शुक्रवारी एमआयडीसीकडून पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या काळात ठाणेकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिका स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू ठेवणार आहे. ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून दररोज ११० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचे नियोजन ठाणे शहर, घोडबंदर, कळवा आणि मुंब्य्रातील काही भागांमध्ये करण्यात येते. हा पाणीपुरवठा बंद असेल त्यावेळेस ठाणे महापालिकेच्या योजनेचा पाणीपुरवठा विभागवार सुरू ठेवण्याचा विचार सुरू असून त्यामध्ये १२ तास ठाणे शहर तर १२ तास घोडबंदर, कळवा आणि मुंब्य्रातील काही भागात असे नियोजन आखले जात आहे. तसेच वागळे इस्टेट परिसर हा उंचीवर असून या भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पाणीपुरवठा करण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पाणीकपातीतून या भागाला वगळण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. कळवा, मुंब्रा परिसरातील बहुतांश भागात एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होतो. या भागात दुसऱ्या स्रोताचे पाणी वळविण्याची व्यवस्थाही नाही. तसेच एमआयडीसीकडून २४ तास पाणीपुरवठा ठेवण्यात येणार असून त्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here