Home राजकीय राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला”, उद्धव ठाकरे

राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला”, उद्धव ठाकरे

228
0

ठाण्यात ठाकरे गटाची पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. याचे जोरदार राजकीय पडसाद उमटत आहेत. मंगळवारी (४ एप्रिल) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. आता मंत्रिमंडळ विस्तारात गुंडमंत्री असे पद निर्माण करून त्या मंत्र्याला गुंड पोसण्याचे काम द्यावे.”

उद्धव ठाकरेंच्या फडतूस गृहमंत्री या विधानाला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. “उद्धव ठाकरे यांनी जी भाषा वापरली तिच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन मला बोलता येते. दोन मंत्री कारागृहात असताना त्यांनी त्यांचे राजीनामे घेतले नाही. तेव्हा लाळ घोटत होते. त्यामुळे खरा लाचार आणि फडतूस कोण हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं आहे. “देवेंद्र फडणवीसांना फडतूस संबोधण्यात आलं. फडणवीसांनी खूप संयम बाळगला. ते उद्धट किंवा उद्ध्वस्त ठाकरे म्हणाले नाही. ही संस्कृती आहे. हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ सुरु आहे. हा खेळ लोक ओळखतात. सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न असून, ती बिलकुल मिळणार नाही. आम्हालाही तिखट बोलता येते. आमच्याकडे बरेचसे काय-काय आहे, पण आम्ही मर्यादा पाळून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलेन,” असा इशारा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

“देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे का? देवेंद्र फडवणीस महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री होते. आता उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आहेत. त्यांनी कामातून त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. बोलणाऱ्यांचं काय कर्तृत्व आहे? नाव सोडलं तर काय आहे तुमच्याकडं? कोणावर बोलत आहात?,” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here