Home Uncategorized पाथर्डी तालुक्यात बिबट्याची दहशत कायम

पाथर्डी तालुक्यात बिबट्याची दहशत कायम

473
0

तालुक्यातील केळवंडी येथे 8 वर्षीय बालकाला, तर मढी येथील 3 वर्षीय चिमुरडीला बिबट्याने पळून नेऊन ठार केल्याची घटना ताजी असताना पाथर्डी शहर परिसरात व वाड्या वस्त्यांवर विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मढी-शिरापूर परिसरातील कराड वस्ती येथे एका चार वर्षांच्या बालकाला गुरुवारी सायंकाळी बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली. परंतु अद्यापही याला वन विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आल्याने मणिकदौंडी, केळवंडी, रांजणी, घुमटवाडी, मढी परिसरात जिवाच्या आकांताने घराला कुंपण घालण्याचे काम नागरिकांनी प्राधान्याने हाती घेतले असून पाथर्डी शहरातील बाजारपेठेतून लाखो रुपयांच्या कच्च्या मालाचा उठाव झाला आहे.

मणिकदौंडी, केळवंडी परिसरातील नागरिकांत, बीड जिल्ह्यातून आलेल्या वाहनाद्वारे पाच बिबट्यांना मणिकदौंडी घाटात सोडल्याची कुजबुज नागरिकांत सुरू आहे. या घटनेला वनविभागाचे काही कर्मचारी खासगीत दुजोरा देत आहेत. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील वन्यजीव तज्ञ विवेक देसाई यांच्या नेतृत्वाखालील 12 जणांच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून पाथर्डी वनविभागाच्या मदतीला कर्जत, जमखेड, श्रीगोंदा येथील वनविभागाचे 15 कर्मचारी येथे दाखल झाले आहेत.

देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथक दोन ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने बिबट्याचा ठावठिकाणा शोधत असून ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी विशिष्ट पद्धतीने योजना आखण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांच्या सहभागाने नरभक्षक बिबट्याला पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

वन्यजीव तज्ञ विवेक देसाई यांनी केळवंडी येथे 8 वर्षांच्या मुलाला पळून नेऊन ठार केले, त्या घटनास्थळी बिबट्या पुन्हा येऊ शकतो, या शक्यतेने त्या स्थळी पिंजरा लावण्यात आला. तसेच मोहरी रोडवरील औटी मळा, भापकर वस्ती येथे एका मळ्यात तसेच गाडगे आंबराई रस्त्यावर बिबट्या दिसून आल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या समवेत परिसराची पाहणी केली. मात्र बिबट्याचा मागमूस लागला नाही.

दरम्यान, गुरुवारी पुन्हा बिबट्याने आणखी एका बालकाला उचलून नेल्याने पाथर्डी तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करण्याची मागणी होत आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याची शोधमोहीम सुरू आहे. जोपर्यंत बिबट्या पकडल्या जात नाही, तोपर्यंत नागरिक भयभीत अवस्थेतच राहणार आहेत. ऐन दिवाळ सणात हे अरिष्ट आल्याने पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ आणखीनच भयभीत झालेले आहेत.

बिबट्याला पकडण्यासाठी जळगावातील पथक दाखल

आणखी एका बालकाला बिबट्याने उचलून नेले पाथर्डी तालुक्यातील मढी-शिरापूर परिसरातील कराड वस्ती येथे एका चार वर्षांच्या बालकाला गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास उचलून नेले. याबाबत मढी देवस्थान समितीच्या सार्वजनिक भोंग्यावरून परिसराला सतर्क करण्यात आले. याबाबत वनिवभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क हाेऊ शकला नाही. त्यामुळे अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.पिटाळून लावण्यासाठी फोडण्यात आले फटाके
पााथर्डी तालुक्यातील केळवंडी परिसरात पिंजरा लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. बिबट्याला पिटाळून लावण्यासाठी दिवाळीपूर्वीच फटाके फोडून बिबट्यापासून संरक्षण करण्याचा केविलवाणा प्रयत्न नागरिकांकडून होत आहे. आठ वर्षीय बालिकेला पळवून नेले, त्या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावला आहे. नागरिक दहशतीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here