Home औरंगाबाद मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवणारे “जनाब देवेंद्र मियाँ फडणवीस”

मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवणारे “जनाब देवेंद्र मियाँ फडणवीस”

42540
0

शिवसेना खा. विनायक राऊतांचा हल्लाबोल

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे :

राज्यात नव्या राजकिय समीकरणांच्या अनुषंगाने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली. त्यावर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत शिवसेना आता “जनाब” झाली असल्याची खोचक टीका केली होती. त्याला शिवसेना नेते खा. विनायक राऊतांनी जोरदार प्रतिउत्तर देत इफ्तार पार्टी मधील फोटो दाखवत जनाब देवेंद्र फडणवीस मियाँ असे संबोधित करत भाजपवर हल्लाबोल केला. मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवणारे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुखांबाबत केलेल्या विधानाचा धिक्कार करत शिवसेनेच्या वाट्याला आलात तर ठेचून काढू असा इशाराही दिला. राऊत मंगळवारी औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मणराव वडले, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना रविवारी संबोधित केले. त्यांनतर आता मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानाची जबाबदारी खा. विनायक राऊतांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ मंगळवारी औरंगाबाद येथून करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. खा. राऊत म्हणाले कि, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदय सम्राट हि उपाधी जनतेने दिली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा आदर करून त्यांचे अनुकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपमधून जेव्हा विरोध झाला तेव्हा बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. बाळासाहेबांबद्दल आदराची भावना या नेत्यांमध्ये होती. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी जनाब असा उल्लेख करून अक्षम्य पाप केले आहे. शिवसेनेने कधीही हिदुत्व सोडले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. असे सांगत फडणवीस यांचे इफ्तार पार्टीमधील आणि अन्य कार्यक्रमाचे फोटो दाखवत हल्लाबोल केला.

शिवसेनेने पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमातील फोटो सादर केले.

एमआयएमची पिलावळ सोडण्याचे भाजपचे षडयंत्र ……

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तमपणे काम करत आहे. मात्र, कुठेतरी तिन्ही पक्षांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हून सत्तेतही लाचारी पत्करणारे देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमची पिलावळ सोडण्याचे षडयंत्र रचले आहे. मात्र, शिवसेना कधीही हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. एमआयएमने भाजपची बटीक म्हणून राहावे. उत्तरप्रदेशात ज्याप्रकारे छुपी युती केली तशी इथेही करून एमआयएमने भाजपसोबतच नांदावे. त्यांना कधीही महाविकास आघाडीत स्थान मिळणार नाही, असा इशारा खा. विनायक राऊतांनी दिला.

सत्तेमध्ये असल्याने शिवसेना मवाळ……

शिवसेनेचा इतिहासच रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष अशी ओळख आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याएका इशाऱ्यावर शिवसैनिक पेटून उठायचे. मात्र, आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री असल्याने विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “जनाब” शिवसेना असे संबोधित करून शिवसेनेला ललकारले आहे. मात्र, असे असताना शिवसेना नेते आणि सैनिक केवळ मवाळ भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे आता हि शिवसेना पूर्वीची शिवसेना राहिली नाही अशी टीका होत आहे. यावर खा. विनायक राऊत यांना दैनिक मराठवाडा साथीच्या प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है असे म्हणत आम्ही कधीही मवाळ भूमिका घेत नाहीत. योग्य उत्तर देऊ असे म्हणत सारवासारव केली.

शिवसेनेने पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमातील फोटो सादर केले.

दहशतवाद्यांचे वकीलपत्र घेणारा पक्ष “एमआयएम”……

औरंगजेबाच्या थडग्यांशी एमआयएमचे नाते जुडलेले आहे. जे दहशतवाद्यांचे वकील पत्र घेतात अशा एमआयएमला शिवसेना कधीही जवळ करणार नाही. खा. ओवैसी यांच्या वाहनावर गोळीबार करून दोन तासात आरोपीना अटक करणे हे सर्व नौटंकी होती. हे सर्व भाजपचे षडयंत्र होते. अशी जहरी टीका राऊतांनी केली.

शिवसेनेच्या अंतर्गत वादावर सारवासारव……

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. निधीवाटपावरून शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर आणि श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीला टार्गेट करत टीका केली. याबाबत खा. राऊतांना छेडले असता त्यांनी स्थानिक एखादे काम झाले नाही तर नाराजी असू शकते. मात्र, सर्वाना समसमान निधी वाटप करण्यात आला आहे. कुठेही दुजाभाव झाला नाही. उलट लोकसभेतील आम्हा खासदारांचा निधी कमी करण्यात आला. तर राज्यात आमदारांना ५ कोटींचा निधी देण्यात आला असे खा.राऊत म्हणाले. शिवसेनेमध्ये आजही पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द प्रमाण असल्याचे सांगून सारवासारव केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here