Home अकाेला विदर्भातील काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

विदर्भातील काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

580
0

अकोला : प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या अकोला जिल्ह्यात शुक्रवारी म्हणजे २४ ते रविवारी म्हणजेच २६ मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने ३ हजारांवरील क्षेत्राला फटका बसला आहे. जिल्ह्यातील तेल्हारा, पातूर, बार्शी, टाकळी तालुक्यांसह काही भागात गारपीटीचा फटका बसला होता. हवामान विभागाच्या संदेशानुसार आता पुन्हा शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट ओढवणार असल्याने चिंता वाढली आहे.
अकोला जिल्ह्यात पावसाचा मुक्काम आता वाढला आहे. काल २४ मार्चला वातावरण कोरडे राहिल्यानंतर आज पुन्हा २५ व २६ मार्चपासून जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यात चार दिवसांच्या अवकाळीने ३ हजार हेक्टरवरील हरभरा, गहू, भाजीपाला व संत्रा पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यात जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे रखडले होते. आता संपातील कर्मचाऱ्यांनी माघार घेतल्याने पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पार पडणार आहे. त्यात दोन दिवस पुन्हा अवकाळीचा इशारा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, या दोन दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. विजांपासून बचाव करावा. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिल्या आहेत.
तेल्हारा तालुक्यात १५ व १६ मार्चला अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर १८ मार्चला विजेच्या कडकडाटासह पाऊस पाडला. शेतातील पिक व सोंगून ठेवलेल्या शेतमालाचीही हानी झाली होती. यंदा तालुक्यात १८ हजार हेक्टरवर हरबरा पेरणी झाली आहे. ७६५ शेतकऱ्यांचे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. चित्तलवाडी, खंडाळा, चिपी, धोंडा आखर, पिंपरखेड या भागात संत्रा लागवड असून, वादळीवारा व पावसामुळे नुकसान झाले होते. तसेच बेलखेड, अडसूळ, तळेगाव, अकोली, दानापूर, हिंगणी परिसरातही पाऊस झाल्याने पिकांची हानी झाली होती. यासह जिल्ह्यातील पातूर, बार्शीटाकळी तालुक्यासह काही भागात गारपीटीचा फटका बसला होता.
दरम्यान, जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड पाऊस झाला होता. परिणामी खरीप हंगामातील उत्पादन प्रचंड घटले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाचाही पिकांना फटका बसला होता. खरीप हंगामातील हे नुकसान रब्बी हंगामात भरून काढू, असा निर्धार करीत शेतकरी कामाला लागले होते. मात्र अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here