Home नाशिक श्रीधर पाटणकरांची चौकशी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला: सुहास कांदें

श्रीधर पाटणकरांची चौकशी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला: सुहास कांदें

270
0

नाशिक:उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथे झालेल्या सभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. यावेळी मालेगावमधून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर देखील त्यांनी जोरदार प्रहार केला होता. उद्धव ठाकरे सभेत बोलताना म्हणाले होते की, ‘तुम्ही म्हणतात कांद्याला भाव मिळाला नाही, मी म्हणतो भाव मिळाला. तुम्ही म्हणतात कांदा खरेदी झाला नाही, मी म्हणतो कांदा खरेदी झाला. मागच्यावर्षीच आपला एक कांदा विकला गेला, असे म्हणत कितीला विकला गेला?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. उद्धव ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आता कांदे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना म्हटले की, मालेगावमधील सभा टोमण्यांची सभा होती. तरुणांना, शेतकऱ्यांना, कर्जबाजारी शेतकऱ्यांना कुठलीही प्रकारची दिशा यातून मिळाली नाही. ज्यांच्यावरती निसर्गाने प्रकोप केला आहे त्यांना देखील यातून कुठली दिशा नव्हती. त्यामुळे मी या सभेला टोमण्यांची सभा, असं नाव देईल, असे आमदार कांदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी गद्दार आणि खोक्यांचा उल्लेख आपल्या सभेतून केला. यावर विचारला असता यावर आमदार कांदे म्हणाले, मी त्यांना आवाहन करतो साहेब आपण माझी नार्को टेस्ट करावी, आम्ही सरकार बदलण्यासाठी एक रुपया जरी घेतला असेल तरी राजकारणातून संन्यास घेऊ, असे सुहास कांदे यांनी म्हटले.तुम्हाला किती कॉन्ट्रॅक्टरकडून खोके मिळाले, याचीदेखील नार्कोटेस्ट करा, असे म्हणत कांदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. मी ज्या कंत्राटदारांची नावे सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनीकडून कसे पैसे मिळाले, कुठे आले?, त्याची जर आपण चौकशी केली तर १०० टक्के आपणही अडचणीत याल. त्याच्यामुळे मी साहेबांना आवाहन करतो की, आपण दोघांनी नार्को टेस्ट करुयात.राजकारणी माणसांना खोके कशासाठी मिळतात, एवढी जनता दूधखुळी नाही. ज्याची महापालिकेत सत्ता आहे त्याला खोके कशासाठी मिळतात? असा सवाल सुहास कांदे यांनी उपस्थित केला. साहेब आपण उभा आयुष्य ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला त्यांच्यासोबत गेलात. भाजपने आपल्याला त्रास दिला, असे मानले तरी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतरणा करण्याची काही गरज नव्हती,असे मला वाटते. खरी गद्दारी आणि बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा कोणी केली असेल तर ती उद्धव साहेबांनी केली आहे, अशी टीका कांदे यांनी केली. उद्धव साहेबांनी जे भावनेचे राजकारण चालू केले आहे. ते भावनेचे राजकारण करू नये, सगळ्या जनतेला माहिती आहे. आम्हालाही खास करून माहिती आहे श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीमध्ये असलेल्या डायरेक्टरांच्या चौकशी थांबवण्यासाठी साहेबांनी राजीनामा दिला, असा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here