Home अहमदनगर के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा...

के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे उद्घाटन

24247
0

कोपरगाव : “भारूड ही लोककला सध्याच्या डिजिटल युगात मागे पडत आहे. परंतु मराठीतील भारूडांनी प्राचीन काळापासून प्रबोधनाची परंपरा जपली आहे. संत एकनाथांची 350 भारुडे, तर संत ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, निळोबा, मुक्ताबाई, जनाबाई आदी सर्व संतांनी भारुडे लिहिली आहेत. भारुडांच्या माध्यमातून आधुनिक काळात शाहीर साबळे विठ्ठल उमप आदी लोककलाकारांनी संतांच्या प्रसिद्ध भारूडांच्या माध्यमातून जीवनभर लोकप्रबोधनाचे कार्य केले.” असे प्रतिपादन कोपरगावातील राष्ट्रीय कीर्तीचे भारुड सम्राट भानुदास बैरागी यांनी येथे केले.स्थानिक के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी. एस. यादव हे होते.
याप्रसंगी श्री. बैरागी यांनी आपल्या भारुड-गायनाच्या कारकिर्दीतचा रोमहर्षक इतिहास कथन केला. मराठीतील प्रसिद्ध भारुडांना लोकप्रिय चित्रपटगीतांच्या चाली लावून अनेक सरकारी योजनांच्या जाहिराती कशा यशस्वी केल्या यांचेही किस्सेही याप्रसंगी सांगितले. तसेच दिल्लीमध्ये मा. पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या समक्ष महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्याची आठवणही त्यांनी कथन केली. त्याच बरोबर ‘आली आली ग भागाबाई’, ‘मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई’ ही भारुडे गावून उपस्थितांची दाद मिळवली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ बी. एस. यादव म्हणाले की “मराठीतील भारूड ही लोकप्रिय कला लुप्त होत असतांना श्री भानुदास बैरागी यांच्या सारखे समर्पित कलाकार किती कष्टाने तिची जोपासना करीत आहेत, ही आजच्या डिजिटल युगात खरोखरच चकित करणारी बाब आहे.” विद्यार्थ्यांनी यापासून बोध घेऊन कलेच्या क्षेत्रात करियर करावे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मा. भानुदास बैरागी यांचा परिचय करून देतांना मराठी विभाग प्रमुख डॉ. गणेश देशमुख म्हणाले की “आजच्या मोबाईल केंद्रित जगात आपल्याला वाचन-लेखनाऐवजी आता फक्त ऑनलाइन राहायलाच अधिक आवडते. परंतु विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथी भानुदास बैरागी यांच्याकडून प्रेरणा घेऊन कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची तयारी ठेवावी.”
या प्रसंगी नुकतीच प्रोफेसर पदी पदोन्नती झालेल्या डॉ. बापूसाहेब भोसले व डॉ. जिभाऊ मोरे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला.
मराठी विभागाचे डॉ. विठ्ठल लंगोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर डॉ एस. बी.दवंगे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here