Home परळी वैजनाथ प्रभू वैद्यनाथ मंदिरातील दर्शन सेवा काळजीचे उपाय करून सुरू ठेवा -चंदुलाल बियाणी

प्रभू वैद्यनाथ मंदिरातील दर्शन सेवा काळजीचे उपाय करून सुरू ठेवा -चंदुलाल बियाणी

3545
0

राज्यातील इतर ठिकाणची मंदिरे दर्शनासाठी खुली असतांना प्रभू वैद्यनाथ मंदिरच बंद कशामुळे? असा सवाल करत ते खुली करण्याची मागणी चंदुलाल बियाणी यांच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या संसर्गाची लाट सर्वत्रच आलेली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याच्या सूचना मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. या अधिकारांत आपण महाशिवरात्रीच्या अगोदरच बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरातील दर्शन सेवा पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले होते आणि आता आपण त्या आदेशाच्या कालावधीत दि.04 एप्रिल पर्यंत वाढ केली आहे. ही मुदतवाढ रद्द करून दर्शन सेवा योग्य ते काळजीचे उपाय करून सुरू ठेवण्यात यावी प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी जिल्हाधिकारी, बीड यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनाही पाठविण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणांत परिस्थिती सारखीच आहे. राज्याच्या विविध भागांतील महत्वाची मंदिरे, व्यापारी संकुले (शॉपिंग मॉल), पर्यटन स्थळे आवश्यक ते काळजीचे उपाय करून सुरू ठेवण्यात आले आहेत. सर्वत्र मंदिरातील दर्शन सुविधासुद्धा भाविकांसाठी उपलब्ध आहे. अशा स्थितीत आपणही प्रभू वैद्यनाथ मंदिरात सॅनिटायझर, मास्क व योग्य सामाजिक अंतर ठेवण्यासाठी उपाययोजना करून दर्शन सुविधा भाविकांसाठी सुरू ठेऊ शकतो. ज्याच्या नावातच वैद्य आहे अशा प्रभू वैद्यनाथांवर लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे. या श्रद्धेला आणि भाविकांच्या भावना विचारात घेता वैद्यनाथ मंदिरातील दर्शन सुविधा काळजीचे सर्व उपाय करून सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी चंदुलाल बियाणी यांच्यामार्फत पाठविलेल्या  निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here